घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!
Namita Patjoshi Inspirational Story: अनेक अडचणी आल्या पण नमिता यांनी धीर सोडला नाही. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला.
Namita Patjoshi Inspirational Story: यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींना संघर्ष चुकला नाही. आज ज्यांच्या यशाच्या कहाण्या कौतुकाने सांगितल्या जातात, ते संघर्षमयी आयुष्याला तितक्याच जिद्दीने भिडले आहेत, हे खूप कमी जणांना माहिती असते. नमिता पतजोशी यापैकीच एक आहेत.
अनेक अडचणी आल्या पण त्यांनी धैर्य ठेवले. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. नमिता या मुळच्या ओडिशाच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा विवाह 1987 मध्ये झाला होता. नमिता यांचे पती ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात महसूल विभागात लिपिक होते. त्यावेळी त्यांना मासिक 800 रुपये पगार मिळत होता. त्यांच्या कुटुंबात 7 जणं होते. या पगारात 7 जणांचे कुटुंब चालवणे कठीण झाले होते. दररोज उदरनिर्वाहाचा प्रश्न सतातवत होता. यातून कायतरी मार्ग काढायला हवा, असे नमिता यांना वाटायचे. मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती. पण मार्ग सापडत नव्हता.
खूप विचार केल्यानंतर, सल्ला घेतल्यानंतर नमिता यांनी 1997 मध्ये एक गाय खरेदी केली. यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून स्वत:चे दागिने त्यांना गहाण ठेवावे लागले. अशाप्रकारे त्यांनी दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. ही वाट सोपी नव्हती. पण त्यांनी दिवस-रात्र एक केला आणि मेहनत करणे सुरु ठेवले. कालांतराने हा व्यवसाय भरभराटीला आला. अनेक वर्षे लोटल्यानंतर आज त्यांचा व्यवसाय दीड कोटी रुपयांचा झाला आहे.
नमिताचे कुटुंब मोठे होते. कुटुंबासाठी दररोज दोन लिटर दूध विकत घ्यावे लागायचे. यासाठी नमिता यांना दिवसाला 20 रुपये खर्च करावे लागले. 1995 मध्ये नमिताच्या वडिलांनी त्यांना एक जर्सी गाय भेट दिली. ती रोज चार लिटर दूध द्यायची. घरातील खर्च कमी करावा लागेल, असा विचार त्यांच्या मनात नेहमी असायचा. दुसरीकडे आपल्या मुलांना सकस पोषण देण्यासाठी गाई पालनाचे महत्त्व त्यांना समजले होते. सर्वकाही सुरळीत सुरु होते. पण यात मिठाचा खडा पडला. दुर्दैवाने ही गाय अवघ्या एक वर्षानंतर बेपत्ता झाली. आता खर्च पुन्हा वाढणार,याची भिती नमिता यांच्या मनात सतावू लागली.
नमिताने 1997 मध्ये 5,400 रुपयांना क्रॉस ब्रीड जर्सी गाय खरेदी केली. यासाठी त्यांनी आपली सोन्याची चेन गहाण ठेवली. ही गाय दररोज सहा लिटर दूध देत असे. यातील 2 लिटर दूध घरच्यांसाठी पुरत असे. उरलेले दूध त्या 10 रुपये प्रति लिटर दराने विकत असत. आता हळुहळू कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारु लागली होती. दूध विकणे हा एक चांगला पर्याय असल्याचे हळूहळू त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या व्यवसायावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.
नमिता यांची कमाई जसजशी वाढत गेली तसतसे त्यांनी हळूहळू आणखी गायी विकत घ्यायला सुरुवात केली. 2015-16 च्या सुमारास नमिता यांनी 50 टक्के अनुदानावर कर्ज घेतले. यातून त्यांनी स्वत:चा व्यवसाय अधिक वाढवला. जास्तीत जास्त ग्राहक जोडून घेतले. त्यांना वेळेत आणि चांगल्या दर्जाचे दुध मिळेल याकडे लक्ष दिले. असे करत करत व्यवसायाची भरभराट झाली. आज नमिता यांच्याकडे जर्सी, सिंधी आणि होल्स्टेन जातीच्या 200 गायी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 18 आदिवासी महिलांसह 25 जणांना रोजगार दिला आहे.
ओडिशातील कोरापुट येथील नमिता यांचे कांचन डेअरी फार्म आहे. येथून दररोज 600 लिटर दुधाचे उत्पादन घेतले जाते. त्याची विक्री 65 रुपये प्रति लिटर दराने केली जाते. म्हणजेच कांचन डेअरीला प्रतिदिन 39,000 रुपये कमाई होते. ग्राहकांना दूध पुरवून शिल्लक राहिलेल्या दुधाचे चीज, दही आणि तूप बनवले जाते. हे बाजारात विकले जाते. अशाप्रकारे नमिता वर्षाला साधारण दीड कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करतात. मनात आलेल्या एका कल्पनेने त्यांचे आयुष्य बदलले.