Success Story: 1500 रुपयात सुरु केला व्यवसाय, आज करतेय 3 कोटींची उलाढाल! बनली शेकडो महिलांची लाडकी बहीण
Success Story: एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
Success Story: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येतात. दरमहिन्याला येणाऱ्या 1500 रुपयांचं नेमकं करायचं काय? इतक्या पैशात व्यवसाय करु शकतो का? असे प्रश्न महिलांकडून विचारले जातात. अशा महिलांसाठी एक प्रेरणा देणारी कहाणी आपण जाणून घेऊया. एका महिलेने 1500 रुपये गुंतवणून स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हा व्यवसाय इतका वाढला की आता या महिलेचे नेटवर्थ 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कोण आहे ही महिला? तिने नेमकं असं काय केलं? सर्वकाही जाणून घेऊया.
यशासाठी मोठ्या भांडवलाची किंवा संसाधनांची आवश्यकता असते असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे बहुतांशजण हेच कारण सांगून व्यवसाय क्षेत्राकडे वळत नाहीत. पण तुमच्याकडे दृढ हेतू आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही गोरखपूरच्या संगीता पांडे या आपल्या कर्तबगारीमुळे लाखो महिलांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. अवघ्या 1500 रुपयांपासून त्यांनी आपला छोटा व्यवसाय सुरु केला. आज त्यांची कंपनी 3 कोटी रुपयांची बनली आहे.
अनेक महिलांना रोजगाराच्या संधी
या व्यवसायामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाचे भवितव्य तर सुरक्षित केलेच. यासोबतच समाजातील अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. पण हे दिसतंय तितकं सोपंही नव्हतं. संगीता यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. साधारण 10 वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. तेव्हा त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. आपल्याला थोडेफार अतिरिक्त उत्पन्न मिळावे, असे त्यांना वाटले. संगीता पांडे यांनी गोरखपूर विद्यापीठातून पदवी घेतली. नोकरीच्या शोधात त्या वणवण भटकल्या पण त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी आल्या. घरी लहान मुलाची काळजी घेताना नोकरी करणे त्यांना शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी नोकरी करण्यापेक्षा आपल्या मुलाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
1500 रुपये गुंतवून सुरु केला व्यवसाय
संगीता पांडे यांनी मिठाईचे बॉक्स बनवण्याचे काम सुरू केले. घरात पडून असलेली जुनी सायकल घेऊन त्या बाजारात गेल्या. येथून त्यांनी 1500 रुपयांचा कच्चा माल आणला. पहिल्या दिवशी त्यांनी 100 पेट्या तयार केल्या. या पेट्या त्यांनी बाजारात विकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्या खचल्या नाहीत, त्यांनी हार मानली नाही. काही काळानंतर त्यांनी लखनौहून स्वस्त कच्चा माल खरेदी करण्यास सुरुवात केली. व्यवसाय करताना त्यांना हळूहळू मार्केटिंगच्या युक्त्या शिकयला मिळाल्या.
दागिने गहाण ठेवून घेतलेले कर्ज
संगीता यांनी दागिने गहाण ठेवले आणि तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले. हळुहळू त्यांनी आपला व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. लखनौ आणि दिल्ली येथून कच्चा माल आणून त्यांनी आपल्या उत्पादनाचा दर्जा सुधारला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागली. काही दिवसांनी त्यांना मोठ्या रकमेची गरज असल्याचे त्यांना जाणवले. मग त्यांनी 35 लाखांचे कर्ज घेतले आणि स्वत:चा कारखाना सुरू केला. आज संगीता यांच्याकडे स्वतःची वाहने आहेत. ज्यातून त्या पेट्यांचा पुरवठा करतात. त्यांनी आता स्वकमाईतून कुटुंबासाठी एक स्कूटर आणि कार देखील खरेदी केली आहे.
बनल्या शेकडो महिलांची लाडकी बहीण
संगीता यांनी स्वत: व्यवसाय करताना अनेक महिलांदेखील सोबत घेतले. यामुळे महिलांना रोजगारही उपलब्ध झाला. या दिवाळीत त्या शेणापासून सेंद्रिय दिवे बनवत आहे. या दिव्यांना बाजारात जास्त मागणी आहे. संगीता यांच्या कंपनीत 100 हून अधिक महिला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत. मुलांचे संगोपन करताना महिलांना कमाई करता यावी यासाठी संगीता या त्यांना प्रोत्साहन देतात. आजच्या घडीला अनेक महिला घरातून बॉक्स बनवत आहेत. याशिवाय दिव्यांग आणि मूकबधिरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज त्या शेकडो महिलांच्या लाडक्या बहीण बनल्या आहेत.