नवी दिल्ली : जगातल्या सर्वाधिक यशस्वी कूटनीतीचा आज विजय झाला आहे. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला सोडणार असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत याची घोषणा केली. जवळपास वीस वर्षं जैश ए मोहम्मदला पोसल्याचे परिणाम आज पाकिस्तानला भोगावे लागत आहेत. साऱ्या जगात पाकिस्तानला विचारणारं कुणीही उरलेलं नाही. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या कार्यक्रमालाही पाकिस्तानला जाता येत नाही. पाकिस्तानची ही कोंडी झाली आहे. गेल्या साडे चार-पाच वर्षात मोदी सरकारच्या परिणामकारक परराष्ट्र धोरणामुळे भारताला याचा फायदा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामात दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. जैशनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पाकिस्तानचा मात्र हल्ल्याशी संबंध नसल्याचा कांगावा सुरु होता. भारतीय वायुसेनेनं मात्र १२ दिवसातच याचा बदला घेतला. हवाईदलाने जैशचे अड्डे उडवले.


गेल्या आठवड्याभरातल्या या घटनांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत कुठे आहे आणि पाकिस्तान कुठे आहे याचा चांगलाच अंदाज आपल्या शत्रूला आला असावा. बहुदा म्हणूनच नेहमी युद्धखोरीची भाषा करणारा पाकिस्तान पहिल्या दिवसापासूनच नरमाईची भूमिका घेतो आहे. भारताला हे धाडसं शक्य झालं, याचं कारण आहे गेल्या पाच वर्षात बदललं परराष्ट्र धोरण.


मोदींच्या या भेटीगाठींचा फायदा आज भारताला परराष्ट्रनीतीमध्ये होतो. अमेरिकनं पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची तंबी दिली आहे. भारतानं नियंत्रण रेषा ओलांडून स्वसंरक्षणासाठी केलेल्या कारवाईचंही अमेरिकनं खुलं समर्थन केलं आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांनी मिळून संयुक्त राष्ट्रात मसूद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे. एफएटीए अर्थात दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे.


परराष्ट्रीय धोरणानं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा कशी बदलली याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारत-चीन संबंध. अगदी २०१६ पर्यंत साम्राज्यवादी मानसिकतेतून डोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारा चीनही आता दहशतवादच्या मुद्द्यावर भारताच्या पाठिशी उभा राहण्याची शक्यता आहे.


भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडलं. गेल्या पाच वर्षात मोदींनी परराष्ट्र संबंधांची चौकट बदलली. शिष्टाचाराचे जोखड तोडून त्याला वैयक्तिक मैत्रीचं कोंदण दिलं आणि आज त्याचा फायदा देशाला मिळतो आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.