शाकाहार, सुधा मूर्ती, ऋषी सुनक अन् नवा वाद! जाणून घ्या #IamPureVegetarian का होतोय ट्रेण्ड
Sudha Murthy Troll : खाण्याशी संबंधित एका मुलाखतीमुळं सुधा मूर्ती यांच्याबाबत अनेकांनीच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर सुरु असणारा हा वाद आहे तरी काय?
Sudha Murthy Troll : काही माणसं त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या आणि राहणीमानाच्याच बळावर इतकी लोकप्रिय होतात, की त्यांच्या आजुबाजूला असण्यानं आपल्यालाही प्रसिद्धी मिळते की काय, असं क्षणभरासाठी वाटतं. यातलंच एक नाव म्हणजे सुधा मूर्ती. लेखिका, एक प्रभावी व्यक्तीमत्त्वं आणि पद्म पुरस्कार विजेत्या. इतकंच काय, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई अशी सुधा मूर्ती यांची ओळख.
इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या कायमच त्याच्या साध्या राहणीमानामुळं चर्चेत असतात. यावेळीसुद्धा त्या अशाच काहीशा कारणानं चर्चेत आल्या. निमित्त होतं ते म्हणते एका मुलाखतीचं. हल्लीच एका जेवणाशी संबंधित कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी बोलण्याच्या ओघात त्यांच्या अनेक सवयींचा उलगडा केला. जिथं त्या शुद्ध शाकाहारी असल्याचं स्पष्ट झालं. इतक्या की, हॉटेलात जातानाही ते शाकाहारीच असेल याची त्या काळजी घेतात.
मुलाखतीदरम्यान बोलत असताना आपण परदेशात जातो तेव्हाही खाऊची मोठी बॅगच सोबत असते असं त्यांनी सांगितलं. या बॅगेत पोळ्या, क्षणात खाता येईल असा रव्याचा एखादा पदार्थ अशा गोष्टी असतात. शाकाहारी आणि मांसाहारी भोजनासाठी एकाच चमच्याचा किंवा भांड्याचा वापर होत असेल अशीच भीती त्यांना वाटत असते. हा झाला सुधा मूर्ती यांच्या स्वभावाचा भाग.
हेसुद्धा पाहा : वाघ पाहायचाय? भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या
सोशल मीडियावर जेव्हा त्यांची ही मुलाखत चर्चेत आली तेव्हा अनेकांनाच त्यांची ही सवय काहीशी खटकली. जिथं नेटकऱ्यांनी हातात मांसाहारी पदार्थांची ताटं पकडलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिसत आहेत. अनेकांनी सुधा मूर्ती यांना मुलगी, जावई आणि नातींना स्पर्शही न करण्याचा सल्ला देत उपरोधिक सूर आळवला. काहींनी थेट प्रश्नही केला, की सुनक यांच्याकडे सासुबाईंसाठी वेगळा चमचा आहे का?
#IamPureVegetarian ट्रेण्डमध्ये
मूर्ती यांच्यावर टीका होत असतानाच अखेर काही नेटकऱ्यांनी आपण शाकाहारी असल्याचं म्हणत त्यात गैर असं काहीच नाही ही बाब प्रकाशझोतात आणली. एका सर्वसाधारण मुलाखतीला धर्म आणि पंथाच्या वळणावर नेणाऱ्या मानसिकतेचीही अनेकांनीच निंदा केली. काहींनी तर ही मुलाखत पटली नाही, तर त्या क्षणी ती पाहणं बंद करण्याचा पर्यायही तुमच्याकडे असल्याचं स्पष्ट मत मांडलं. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी इतरांपुढे सांगणं कितपत योग्य? एक वाचक किंवा प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं?