कांद्यानंतर आता साखरेच्या किंमती वाढणार?
गेल्या काही वर्षांपासून साखरेचं उत्पादन चांगलं होत आहे. परंतु....
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून साखरेचं उत्पादन चांगलं होत आहे. परंतु यावर्षी साखरेच्या उत्पादनात कमी होण्याची शक्यता आहे. सरकारने यावर्षी देशात साखरेचं उत्पादन जवळपास २७३ लाख टन होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर गेल्या वर्षी साखरेचं उत्पादन जवळपास ३३२ लाख टन इतकं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१८-१९ दरम्यान देशातील ४१६ साखर कारखान्यांनी १५ जानेवारी २०१९ पर्यंत १०७ कोटी टन साखरेचं उत्पादन केलं. तर गेल्या वर्षी याच दरम्यान ४९६ साखर कारखान्यांनी ११८ कोटी टन साखरेचं उत्पादन केलं होतं.
३१ डिसेंबर २०१८ च्या परिस्थितीनुसार, साखर कारखान्यांची ऊसावरील थकबाकी २१,२२६.६३ कोटी इतकी होती. 'इंडियन शुगर मिल्स असोशिएशन' या खासगी साखर कारखान्यांच्या संस्थेने, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत साखर उत्पादन ५३ टक्क्यांनी कमी झालं असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्रात यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत ४३ साखर कारखान्यांमध्ये ६७ हजार टन साखरेचं उत्पादन झालं. तर गेल्यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत १७५ साखर कारखाने चालू होते आणि साखरेचं उत्पादन १८.८९ लाख टन झालं असल्याची माहिती आहे. साखरेचं उत्पादन कमी झाल्याने याचा परिणाम साखरेच्या किंमतींवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.