दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर
Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे कार्य प्रगतीपथावर आहे. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. तर, भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा पुढील वर्षी 22 जानेवारी रोजी होणार आहे. तर, 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान कोणत्यातरी एका दिवशी पंतप्रधान या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. त्याचबरोबर, त्यांनी आणखी एक आश्चर्यजनक माहिती दिली आहे. रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील, हे अद्भूत दृश्य पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सूर्यकिरणे रामलल्लाच्या मूर्तीवर पडणार आहेत. मंदिरात अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर गर्भगृहात दोन मूर्ती असणार आहेत एक चल आणि अचल. एक मूर्ती बाल्यावस्थेतील असणार आहे तर दुसरी रामलल्लाची मूर्ती असणार आहे.
मंदिराची एक खासियत सांगताना नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे की, मंदिराचे बांधकाम करताना अशी व्यवस्था करण्यात आली आहे की रामनवमीच्या दिवशी 12 वाजता भगवान रामाच्या माथ्यावर सूर्याची किरणे पडतील. मूर्तीपण अशाच दिशेला ठेवण्यात आली आहे. तिथे सूर्याची किरणे सरळ न पडता मूर्तीवर पडतील. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्युट रुडकी आणि पुणे येथील एक अॅस्ट्रॉनॉमिकल संस्थेने कम्पूटरीकृत सिस्टम तयार केले आहे. यात एक छोटेसे उपकरण मंदिराच्या कळसावर लावण्यात आले आहे. जेणेकरुन सूर्याची किरणे थेट या माध्यमातून रिफ्लेक्ट होऊन भगवान रामाच्या मस्तकावर पडतील.
हे भन्नाट उपकरण बेंगळुरूमध्ये बनवले जात आहे आणि त्याची रचना आणि देखभाल रुडकी आणि पुण्यातील संस्था आणि शास्त्रज्ञ करत आहेत. रामनवमीच्या दिवशी हे काही सेकंदांसाठीच घडेल, त्यामुळे त्या दिवशी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतील.' त्यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू नये, हे मोठे आव्हान असेल आणि या आव्हानावर मात करण्यासाठी ही घटना पडद्यावर आणि दूरचित्रवाणीवर दाखवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.