आठ महिन्यांची गर्भवती कमांडो करतेय नक्षलवाद्यांशी दोन हात
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्हातील घटना
मुंबई : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे ती एका नव्या जीवाला जन्म देत असते. तिच्या गरोदरपणात जवळच्यांकडून तर गोड कौतुक होतच असतं. त्यावेळी ती स्त्री देखील अतिशय संवेदनशील असते. पण अशा नाजूक काळात जेव्हा ती गरोदर महिला देशसेवेसाठी हातात एके47 घेते.
छत्तीसगडचा दंतेवाडा जिल्हा नक्षलवाद्यांशी दोन हात करणारी ही गर्भवती स्त्री म्हणजे 'सुनैना पटेल'. पाठीवर 8 ते 10 किलोंचे वजन घेऊन हातात AK-47 हातात घेऊन सुनैना 'डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड'मध्ये 'दंतेश्वरी फायटर' म्हणून कार्यरत आहे.
आठ महिन्याच्या गर्भाला सांभाळत सुनैना आपलं कर्तव्य बजावत आहे. सुनैनाने दिलेल्या माहितीत ती डीआरजीची टीम तयार झाल्यानंतर एका महिन्यात गर्भवती राहिली. तिने सुरूवातीला आपल्या अधिकाऱ्यांना गरोदरपणाबद्दल काहीच सांगितल नाही. कारण तिला नक्षल ऑपरेशनमध्ये दाखल व्हायचं होतं. साडे सहा महिन्यानंतर तिने आपण गर्भवती असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं.
पुढे सुनैना म्हणाली की,'आजही मला कुठेही जायला सांगितलं तरी माझी तयारी आहे. पण आता मला ऑपरेशनला पाठवणं बंद केलं आहे.'
पूर्वी युनिटमध्ये महिला कमांडोंची संख्या फार कमी होती मात्र सुनैना पटेल यांनी कमांडर पद स्वीकारल्यापासून युनिटमध्ये महिला कमांडोंची संख्या दुप्पट झाली असल्याचे दंतेवाडाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी सांगितले.