सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांच्याविरोधातील खटल्याची २१ फेब्रुवारीपासून सुनावणी
दिल्लीमधील हॉटेल लीला पॅलेस येथे मृतदेह आढळून आला होता.
नवी दिल्ली: येत्या २१ तारखेपासून दिल्ली सत्र न्यायालयात सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणातील आरोपी आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमधील एका खोलीत संशयास्पद अवस्थेतील सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात सुनंदा यांचे पती शशी थरूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे व क्रूर वर्तणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता. यापूर्वी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पातियाळा हाऊस न्यायालयाकडे या खटल्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र, पातियाळा हाऊस न्यायालयाने ही मागणी फेटाळत हा खटला पुन्हा दिल्ली सत्र न्यायालयाकडे वर्ग केला होता.
थरुर यांच्यावर कलम ४९८ अ आणि कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नव्हती. गेल्यावर्षीपासून ते नियमित जामिनावर बाहेर आहेत.
सुनंदा पुष्कर व शशी थरुर यांचा २०१० साली विवाह झाला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीमधील हॉटेल लीला पॅलेस येथे मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. औषधांच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल सादर केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली होती. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगामुळे झाला आहे, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले होते. सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्याच्या खुणा, सिरींजच्या खुणा आणि झटापट झाल्याने जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या होत्या. या खुणांमुळे त्यांची हत्याच झाली असावी असे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते.