सलाम! कधीकाळी 50 रुपयांसाठी करत होता संघर्ष, आज साहेब झालाय
सुपर शिक्षक आनंद कुमार यांच्या विद्यार्थ्याची यशोगाथा
पाटणा : आनंद कुमार हे नावं आपण प्रत्येकाने ऐकलं असेल. Super 30 चे संस्थापक. कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून ओळख असलेल्या आनंद कुमार (Anand Kumar super 30) यांच्या संघर्षमय जीवनावर 2019 मध्ये सिनेमाही बनवला गेला होता. गरीब आणि झोपडपट्टीत (Slum areas) राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आणि त्यांना IIT-JEE परीक्षेत उत्तम मिळवून देण्याचं काम आनंद कुमार यांनी केलं आहे. आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनात शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदांवर काम करत आहेत.
यापैकीच एका विद्यार्थ्यानं नुकतीच आनंद कुमार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो आनंद कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला करत या विदयार्थ्याचं कौतुक केलं आहे.
आनंद कुमार यांनी या विद्यार्थ्याचं कौतुक करण्याचं कारणही तसंच आहे. कृष्ण राय (Krushna Roy) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. कृष्ण राय यांनी हालाखिच्या परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. 'कधी काळी या विद्यार्थ्याला अवघ्या पन्नास रुपयांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. मात्र त्यांना UPSC ची परीक्षा (UPSC Exam) पास केली आहे. आता तो असिस्टंट कमिश्नर (Assistant Commissioner) बनला आहे' असं आनंद कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
असिस्टंट कमिश्नर बनल्यानंतरही कृष्ण राय याच्या मनात गरीब आणि मागासलेल्या लोकांविषयी संवेदशीलता आहे हे बघून मला आनंद झाला.' असंही आनंद कुमार यांनी म्हंटल आहे. आनंद कुमार यांचं ट्टिवट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी आनंद कुमार यांच्या कार्याला सलाम केला आहे.
कोण आहेत आनंद कुमार
जगाला आनंद कुमार यांची ओळख ‘सुपर-30 ’ संस्थेचे संस्थापक म्हणून आहे. दरवर्षी आयआयटी अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीसाठीच्या प्रवेश परीक्षांचे निकाल लागतात, तेव्हा ‘सुपर-30 ’ची भरपूर चर्चा होते. त्याला कारणही तसंच आहे. 2002 साली आनंद कुमार यांनी ‘सुपर 30’ची सुरुवात केली आणि तीस मुलांना मोफत आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन देणं सुरु केलं. पहिल्याच वर्षी, म्हणजेच 2003 साली आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत ‘सुपर 30 ’च्या 30 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 2004 मध्ये 22 , तर 2005 मध्ये 26 विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याची करामत करुन दाखवली. 2008 मध्ये तर ‘सुपर 30’ चा निकाल 100 टक्के लागला होता. 2014 सालीही ‘सुपर 30 ’मधल्या 30 मुलांपैकी 27 मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला होता.