संतापजनक! तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार, 51 वेळा तापलेल्या सळईने पोटावर चटके, शेवटी...
अंधश्रद्धा कधी संपणार, बाळाला निमोनिया झाल्याने डॉक्टरऐवजी आईने त्याला मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाने अवघ्या तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार केल्याची संतापजनक घटना
Superstition : आजच्या 21 व्या शतकात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी समाजातून अंधश्रद्धेचं (Superstition) भूत काही उतरायला तयार नाही. आजही अनेक जण अंधश्रद्धेला बळी पडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला उपचाराच्या नावाखाली त्याच्या आईनेच भोंदूबाबाच्या हाती स्वाधिन केलं. या भोंदूबाबाने मुलावर अघोरी उपचार केले. बाळाच्या पोटावर त्या भोंदूबाबाने तब्बल 51 वेळा गरम सळईचे चटके दिले. बाळाची प्रकृती अधिकच बिघडल्याने अखेर बाळाला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान बाळाचा मृत्यू झाला.
बाळावर अघोरी उपचार
मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) शहडोल इथली ही संतापजनक घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. तीन महिन्याच्या बाळाला निमोनिया (Pneumonia) झाला होता. त्यामुळे बाळाला श्वासोश्वास करण्यास त्रास होत होता. बाळाची स्थिती पाहून त्याच्या आईने डॉक्टरऐवजी (Doctor) एका मांत्रिककडे उपचारासाठी सोपवलं. मांत्रिकाने उपाचाराच्या नावाखाली बाळाच्या पोटावर तापलेल्या सळईचे चटके दिले. एक दोन नाही तर तब्बल 51 वेळा त्याने हा प्रयोग केला. पण यामुळे बाळाची तब्येत अधिकच बिघडली.
बाळाची प्रकृती बिघडली
बाळाची प्रकृती बिघडल्यानंतर मांत्रिक घाबरला त्याने बाळाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगतिलं. त्यानंतर मुलाच्या आईने बाळाला डॉक्टरकडे आणलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला. उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम सळईचे चटके दिल्याने बाळाची प्रकृती बिघडली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : चिमुरड्याच्या घशात अडकला काजू, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
बाळाला निमोनिया झाल्यानंतर स्थानिक अंगणवाडी कार्यकर्त्यांना बाळाच्या आईला डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. पण बाळाच्या आईने डॉक्टरकडे नेण्याऐवजी मांत्रिकाकडे नेलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा कलेक्टरांनी दिले आहेत. याप्रकरणी महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली आहे.