कोरोना रुग्णांना जनावरांची वागणूक; सर्वोच्च न्यायालयाचा संताप
मृतदेहांची होणारी हेळसांड पाहता
नवी दिल्ली : coronavirus कोरोना रुग्णांना योग्य ते उपचार मिळण्यासंदर्भात आणि या आजारामुळं मृत पावणाऱ्यांच्या मृदेहांना किमान सामाजिक भान जपत वागणूक देण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायायलयात शुक्रवारी सुनावणी झाली. कोरोना रुग्णांवरील उपचार आणि कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड याप्रकरणी सुनावणी करत न्यायमूर्ती संजय किशन कौल, एम.आर.शाह आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानं दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारचा खडे बोल सुनावले.
सदर प्रकरणीची पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे. दिल्लीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीला अनेक रुग्णालयांनी दाखल करण्यास नकार दिला, परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला ज्याची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आली.
सध्याच्या घडीला विविध रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर होणारा उपचार आणि या व्हायरसची लागण झाल्यामुळे मृत पावलेल्यांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड पाहता हा मुद्दा अधोरेखित करत त्यांना दिली जाणाऱ्या वागणुकीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. जे करत असतेवेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रासोबतच राज्य सरकारलाही धारेवर धरलं.
गेल्या काही काळापासून दिल्लीमध्ये कमी करण्यात आलेली कोरोना चाचण्यांची संख्या आणि अनलॉकचे परिणाम अधोरेखित करत कोरोना रुग्णांना दिली जाणारी वागणूक ही जनावरांपेक्षाही अधिक वाईट असल्याचाच सूर सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं आळवला. मुंबई आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये असणारी तफावत समोर आणत या घडीला मृतांहून अधिक जिवंत असणाऱ्यांची जास्त चिंता वाटत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं.
काही राज्यांमध्ये कचऱ्यामध्ये मृतदेह सापडणं, रुग्णांसमवेतच मृतदेह ठेवणं, त्यांना दोरीने बांधून ओढत नेणं यांसारख्या कृत्यांवरही न्यायालयाकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याविषयीच्या नियमावलीचं पालन होत नसल्याची बाब प्रकाशात आणत काही रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या निधनाची माहितीही दिली जात नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.
चाचण्या कमी का?
महाराष्ट्राहगसह इतरही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना चाचण्यांची संख्या कमी का, असा प्रश्न उपस्थित करत राज्यांना चाचण्या वाढवल्यासच त्या ठिकाणी असणारी कोरोनाची मूळ परिस्थिती सर्वांपर्यंत पोहोचू शकेल हे स्पष्ट केलं.