नवी दिल्ली : राजस्थानच्या तुरुंगात कैद असलेल्या एका कॅन्सर पीडित कैद्यानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. या याचिकेतून कैद्यानं आपल्याला कर्करोग असल्याचं सांगत आईच्या कुशीत शेवटचा श्वास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं मात्र त्याची ही याचिका फेटाळून लावलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसू जैफ असं या कैद्याचं नाव आहे. त्याच्याकडे २३ लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि अशा बनावट नोटा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं. जयपूरमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


जयपूरच्या तुरुंगात बंद असताना आसू जैफ याला तोंडाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. सध्या जैफ याची तब्येत गंभीर आहे. राजस्थान हायकोर्टानं या प्रकरणात २४ एप्रिल रोजी जैफ याचा अंतिम जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आसू जैफ यानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. 


राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणीसाठी दीर्घकाळ जाईल... तेव्हापर्यंत आपण जिवंत राहू की नाही? याचीही खात्री देता येत नाही... किंवा सुनावणी दरम्यानची कारवाई समजताना आपलं मानसिक संतुलन ढासळेल, असंही त्यानं याचिकेत म्हटलं होतं. 'कर्करोगाचे रुग्ण जगण्याची उमेद गमावतात. मीदेखील जगण्याची उमेद गमावू बसलोय पण मला माझ्या आईच्या कुशीत शेवटचा श्वास घ्यायचाय... त्यामुळे मला माझ्या शेवटच्या दिवसांत आई आणि इतर जवळच्या लोकांचा सहवास लाभू शकेल' असं म्हणत त्यानं जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.



तुरुंगात असतानाच आसू जैफ याला कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्याला गेल्या आठ महिन्यांपासून दररोज रेडिओथेरेपीला सामोरं जावं लागतंय. 


परंतु, आरोपीवर सवाई मान सिंह रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं सांगतानाच सर्वोच्च न्यायालयानं त्याचा हा अर्ज फेटाळून लावलाय.