RG Kar Medical Collage Case Supreme court Hearing: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपील सिब्बल पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडत आहेत. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायलयाकडे या प्रकरणाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद करावं अशी मागणी केली. महिला वकिलांना धमकावलं जात असल्याचा दावा करत सिब्बल यांनी ही मागणी केली. हे प्रकरण फार संवेदनशील असून आपल्यासोबत काम करणाऱ्या तसेच सरकारची बाजू मांडणाऱ्या महिला सहकाऱ्यांना धमकावलं जात असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. 


सरन्यायाधीश काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिब्बल यांनी केलेली मागणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी फेटाळून लावली. "हे मुक्त न्यायालय आहे," असं म्हणत चंद्रचूड यांनी सिब्बल यांची मागणी फेटाळली. वकिलांना धमकवण्यात आलं तर कोर्ट मध्यस्थी करेल असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.


"आम्ही इथे आरोपीची बाजू मांडत नसून..."


"जे काही घडत आहे त्याची मला फार चिंता वाटतेय. अशाप्रकारच्या प्रकरणांचं थेट प्रक्षेपण केलं जात तेव्हा त्याचे परिणाम होतात. आम्ही इथे आरोपीची बाजू मांडत नसून आम्ही सरकारची बाजू मांडतोय. या प्रकरणावर न्यायालयाने नोंदवलेल्या मतांमुळे आमची प्रतिष्ठा काही काळात पणाला मिळते," असं म्हणत सिब्बल यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपिठाकडे थेट प्रक्षेपण थांबवण्याची मागणी केली.


बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या


"आम्ही थेट प्रक्षेपण थांबवणार नाही. हे जनहितार्थ आहे. हे मुक्त न्यायालय आहे," असं मोजक्या शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सिब्बल यांना सांगितलं. यावर सिब्बल यांनी महिला वकिलांना धमकावलं जात असल्याचा तसेच त्यांना अ‍ॅसिड हल्ले आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा केला. "माझ्या चेंबरमधील महिलांना धमकावलं जात आहे. मी हसल्याचं सांगितलं जात आहे. मी कधी हसलो? असं म्हटलं जातं आहे की त्यांच्यावर (महिला सहकाऱ्यांवर) अ‍ॅसिड फेकलं जाईल त्यांच्यावर बलात्कार केला जाईल. प्रत्यक्षात आजूबाजूला वावरणारे लोक हे म्हणत आहेत," असं सिब्बल यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना म्हटलं.


चंद्रचूड आपल्या भूमिकेवर ठाम


मात्र यानंतरही सरन्यायाधीश आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी, "कोणत्याही महिलेला काही धोका आहे का? या प्रकरणातील पुरुष अथावा महिलांना काही धोका असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ," असं स्पष्ट शब्दांमध्ये सिब्बल यांना सांगितलं.   


नेमकं प्रकरण काय?


9 ऑगस्टच्या मध्यरात्री आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस मित्राला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सबळ पुरावे या आरोपीविरोधात असल्याचं सांगितलं जात आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मागील एका महिन्याहून अधिक काळापासून कोलकात्यासहीत पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन सुरु असल्याने आरोग्य सेवेला याचा फटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांमध्ये चर्चेचे पहिले चार प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पाचव्या प्रयत्नामध्ये डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. सध्या देशभरामध्ये हे प्रकरण चर्चेत असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.