नवी दिल्ली: ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडाळीमुळे अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता शुक्रवारी मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित केले होते. यानंतर भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर आज न्यायालयाने कमलनाथ सरकारला तातडीने सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाकडून कर्नाटक व मध्य प्रदेशाच्या पोलीस महासंचालकांना बंडखोर आमदारांना विधानसभेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा पुरवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 


मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. मात्र, कमलनाथ यांनी आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचे सांगत भाजपविरोधात दंड थोपटले होते. त्यामुळे आता उद्या कमलनाथ काँग्रेसचे सरकार वाचवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.