सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जोडण्याचा विचार आहे का ?- सर्वोच्च न्यायालय
सरकारतर्फे सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जो़डण्याचा विचार ?
नवी दिल्ली : व्हॉट्सएप, फेसबुक असे सोशल मीडिया अकाऊंट आधारकार्डशी लिंक करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. सरकारतर्फे सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जो़डण्याचा विचार होत असेल तर योजना सांगावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमुर्ती दिपक गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने केंद्राला यासंदर्भातील माहीती न्यायालयात सादर करण्यास सांगितले. सोशल मीडिया आधारशी जोडण्यावर काही विचार सुरु आहे का ? असा प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आला.
मद्रास उच्च न्यायालयात दोन याचिका आणि मुंबई तसेच मध्य प्रदेश न्यायालयातही प्रत्येकी एक याचिका दाखल झाली आहे. आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र हे सोशल मीडिया अकाऊंटसाठी अनिवार्य करायला हवे असे या याचिकांमध्ये म्हटले आहे.
विविध उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल झाल्या. या सर्व याचिका हस्तांतरीत करण्याची मागणी फेसबुकने केली. वेगवेगळ्या न्यायलयाचे परस्पर विरोधी निर्णय होऊ शकतात. या पार्श्वभुमीवर न्याय व्हावा असे फेसबुकने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला होणार आहे.