एसडीएमचा व्हीडिओ व्हायरल, रस्त्यावर एका तरूणाला थोबाडीत मारली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये एसडीएमने एका युवकाला जोरदार थोबाडीत मारली.
सूरजपूर : छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्हाधिकाऱ्यांने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हीडिओ या आधी सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. त्यामुळे त्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. ते प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत सूरजपूर येथील एसडीएम प्रकाशसिंग राजपूत यांचा असाच व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये प्रकाशसिंग राजपूत एका युवकाला रस्त्यावर मारताना दिसत आहे. या व्हिडीओला विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवरुन ट्वीट केले आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लॉकडाऊनमध्ये एसडीएम प्रकाशसिंग राजपूत लोकांना मारत आहे आणि त्यांना उठा-बश्या काढायला लावत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये एसडीएमने एका युवकाला जोरदार थोबाडीत मारली. परंतु एवढे करून ते थांबले नाहीत, त्यांनी तेथेच त्यामुलाला उठा-बश्या काढायला लावल्या. दरम्यान हा तरुण त्यांची हात जोडून माफी मागताना देखील दिसत आहे.
या आधी जिल्हाधिकाऱ्याने एका तरुणाला मारले आणि त्याचा मोबाईल तोडला, तेव्हा याचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी रणबीर शर्माला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी आपली चुकी मानून त्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबीयांची माफी मागितली.
तरीही त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणीही लोकांकडून करण्यात आली. त्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तातडीने रणबीर शर्मा यांची बदली केली. त्यामुळे आता या पोलिस एसडीएम प्रकरणात छत्तीसगड सरकार काय कारवाई करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे.
एकिकडे जनता कोरोनामुळे त्रस्त आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनने त्यांच्या दु: खामध्ये आणखी भर घातली आहे. त्यात लोकांच्या सेवेसाठी नेमण्यात आलेले अधिकारी लोकांशी अशा प्रकारे गैरवर्तन करत आहेत. त्यामुळे लोकांचे जगणेच आता कठीण झाले आहे.