गांधीनगर : प्रत्येक ठिकाणी आता आधार कार्ड महत्त्वाचे झाले आहे. आधारशिवाय माणूस निराधार झाला आहे. शालेय प्रवेशापासून ते मृत्यूपर्यंत आधार कार्ड उपयोगी पडते. तसेच विदेश वारी करण्याचा योग कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पासपोर्ट असणे महत्त्वाचे आहे. ऐनवेळी पासपोर्ट नसल्याने अनेकांना आपला विदेश दौरा रद्द करावा लागतो. त्यामुळे वेळेतच आवश्यक ती कागदपत्रे काढल्यास गैरसुविधा होत नाही. गुजरातमधील सुरत येथील नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट बनून तयार आहेत. डिजिटल इंडियाचा हा अनोखा विक्रम आहे. या मुलीचे वय अवघे 'दोन तास' इतके आहे. देशात मोठ्या प्रमाणावर डिजिटल इंडियाची चर्चा आहे, पण याची विश्वासार्हता किती खरी आहे, हे आम्हाला पाहायचं होतं, असे मत नवजात मुलीच्या पालकांनी व्यक्त केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरतेतील अमरोली भागात राहणाऱ्या अंकित-भूमिबेन हे दाम्पत्य आई-वडील होणार होते. प्रसूतीच्या आधीच या दाम्पत्याने होणाऱ्या पाल्यासाठी कागदपत्रांची तयारी केली होती. डिजिटल इंडिया हा प्रकार किती यशस्वी आहे, तसेच डिजिटल इंडियाबद्दल लोकांमध्ये माहिती व्हावी, या उद्देशाने आवश्यक कागदांची पूर्तता या दाम्पत्याने केली होती. होणाऱ्या अपत्याचे नाव देखील ठरवले होते. 


जन्मलेल्या मुलीचे नाव नाभिया ठेवण्यात आले. मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासाठी दाम्पत्याने ऑनलाईन अर्ज केले, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. अर्ज केल्यानंतरच्या पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या हातात मुलीचे जन्म प्रमाणपत्र होते. जन्म प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आधार कार्डासाठी आणि पासपोर्टसाठी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर आवश्यक माहिती दिल्यावर काही क्षणांत आधार कार्ड आणि पासपोर्ट त्यांच्या हातात होते. अशाच प्रकारे नुकत्याच जन्मलेल्या नाभियाला दोन तासात जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट मिळाले. 


अधिकाऱ्यांनी केली मदत


पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही क्षणांत मी आवश्यक कागदपत्रे घेऊन पासपोर्ट कार्यालयात पोहोचलो. पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे दोन तासांत मला पासपोर्ट मिळाले, अशी माहिती नाभियाचे वडील अंकित यांनी दिली. याआधी जन्माच्या तिसऱ्या तासांत पासपोर्ट मिळवण्याचा मान सुरतेतील, पर्वत पाटिया या भागाने मिळवला होता. पण हा विक्रम आता नाभियाच्या नावे झाला आहे.


आधार कार्डासाठी शरीराच्या काही भागांचे माहिती आणि ठशे  बायोमॅट्रिकपणे द्यावे लागतात. यात डोळ्यांचे बायोमॅट्रिक गरजेचे असते. नाभियाच्या डोळ्यांच्या बायोमॅट्रीक नोंद घेण्यासाठी  अंकित यांना खटाटोप करावा लागला. मुलगी लहान असल्याने ती डोळे उघडत नसल्याने त्यांना त्रास झाला.  आपल्या मुलीच्या नावे वेगळ्या विक्रमाची नोंद असल्याने या दाम्पत्याच्या घरात आनंदाचे वातवरण आहे. अंकित, या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याच्या तयारीत आहेत.