सूरत : गुजरातमधल्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  हळदीत मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील ही घटना आहे. 33 वर्षीय मितेश भाई चौधरी याचं लग्न बालोद तालुक्यातील धामंडळा गावातील मुलीशी ठरलं होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. लग्नाला काही तासच शिल्लक होते, लग्नाच्या आदल्या रात्री हळदीत मितेश नातेवाईक आणि मित्रही सहभागी झाले होते. 


आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेच्या तालावर नाचत होती. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही स्वत:ला रोखता आलं नाही आणि तोही मित्रांसोब नाचू लागला. नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर बसवलं आणि नाचायला सुरुवात केली. पण अचानक मितेशच्या छातीत दुखू लागलं.


मितेशची तब्येत बिघडल्याचं पाहातच कुटुंबियांनी तात्काळ त्याला स्थानिक रुग्णालयात नेलं. पण इथल्या डॉक्टरांनी त्याची स्थिती पाहून त्याला मोठ्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. यानंतर मितेशला बारडोली इथल्या शासकीय रुग्णलायत नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


मितेशच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. लग्नाच्या काही तास आधीच झालेल्या या घटनेनं सर्वच हळहळले. जिथे ढोल-ताशे, डीजे वाजत होता तिथे शोककळा पसरली.