गांधीनगर : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन-३ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी लॉगडाऊन-२मध्ये मजुरांना गावी परण्याची मुभा देण्यात आली आहे. तसे सरकारकडून नियोजन सुरु आहे. परप्रांतीय मजुरांना घरी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळे सूरतमध्ये एकच गर्दी दिसून आली. या मजुरांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. तसेच गाड्यांचीही तोडफोडही केली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गुजरातच्या सूरतमध्ये मजुरांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने वातावरण अधिक चिघळले. पालसाणाच्या वरेली गावात हजारोंहून अधिक संख्येने असलेल्या मजुरांना अडवणे यावेळी पोलिसांना कठीण झाले होते. मजुरांनी जोरदार गोंधळ घालत पोलिसांवर दगडफेक केली. मजुरांनी आपल्या गावी जाण्यावरून पोलिसांशी  हुज्जत घातली. मात्र परिस्थिती बिघडताच पोलिसांनी  अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि गोंधळ निर्माण झाला. 


दरम्यान, महाराष्ट्रात पुणे येथील वारजे पुलाखाली परप्रांतीय कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तसेच डिस्टंसिंगला हरताळ फासला गेला होता.  परप्रांतीय मजुरांनी नावे नोंदवण्यासाठी एकच गर्दी केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 


 परप्रांतीय कामगारांना आपल्या गावी परत जायचे आहे. हे लोक पुलाखाली मजूर अड्ड्यावर एकत्र आले. या कामगारांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत होती. त्यातून गोंधळ सुरु झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. उपद्रवी कामगारांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.


केंद्र सरकारने परराज्यातील नागरिकांना प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवड मध्ये पास मिळवण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासला जात आहे. मेडिकल सर्टिफिकेट असून ही पोलीस परवानगी देत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.