नवी दिल्ली: गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी केलेल्या उपरोधिक टीकेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी आजच्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख सरेंडर मोदी Surender Modi असा केला होता. मात्र, यामध्ये सरेंडर शब्दाचे स्पेलिंग चुकल्यामुळे ट्विटरवर अनेक युजर्सनी राहुल गांधी यांची फिरकी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार

राहुल गांधी यांच्या या ट्विटला २० हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर ८ हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. या ट्विटवर तब्बल ९ हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. यापैकी अनेकांनी सरेंडर शब्दाच्या स्पेलिंगवरुन राहुल गांधी यांची फिरकी घेतली. 



'दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?'


Surrender Modi म्हणजे काय? तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, असा प्रश्न भाविका नावाच्या युजरने उपस्थित केला. तर काहीजणांनी राहुल गांधी यांचे समर्थनही केले आहे. राहुल गांधींना स्पेलिंग शिकवण्याची गरज नाही. आपल्याला काय बोलायचे आहे, हे त्यांना नेमके ठाऊक आहे. त्यांना केवळ नरेंद्र या शब्दाशी सार्धम्य साधण्यासाठी शब्दांचा खेळ केला, असे अंगद सोही याने म्हटले आहे. 


भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी मोदी सरकारवर सातत्याने टीकेची तोफ डागत आहेत. आज सकाळीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनच्या ताब्यात जाऊन दिला. जर हा भूभाग चीनचाच होता तर मग आपले सैनिक कसे मारले गेले? आपले सैनिक नक्की कोणत्या जागी शहीद झाले, असे अनेक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.