नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला. भारताचा हा हल्ला पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मदसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात प्रचंड संताप होता. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात सरकारने मोठी कारवाई करण्याची मोठी गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली होती. त्यानुसार भारतीय वायूदलाने अवघ्या ११ दिवसांत रणनीती रचून ती प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविली. पुलवामा हल्ल्यानंतर भारत काहीतरी मोठी कारवाई करणार, याची कुणकुण सर्वांनाच होती. त्यामुळे वायूदलाच्या या एअर स्ट्राईकविषयी अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


१५ फेब्रुवारी- एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धानोआ यांनी एअर स्ट्राईकचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला. या प्रस्तावाला सरकारकडून लगेच मंजूरी देण्यात आली. 


१६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी- सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर वायूदल आणि लष्कराने हेरॉन ड्रोन्सच्या सहाय्याने सीमारेषेवर पाळत ठेवायला सुरुवात केली. 


२१ फेब्रुवारी- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमोर कोणत्या ठिकाणी एअर स्ट्राईक करता येईल, याचा प्रस्ताव मांडण्यात आला.


२० फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी- वायूदल आणि गुप्तचर यंत्रणांनी एअर स्ट्राईकसाठी संभाव्य लक्ष्य निश्चित केले. 


फेब्रुवारी २२- वायूदलाच्या पहिल्या स्क्वॉड्रनमधील 'टायगर' आणि सातव्या स्क्वॉड्रनमधील 'बॅटल एक्सेस' या तुकड्यांना मोहीमेसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय मोहिमेसाठी दोन मिराज स्क्वाड्रनमधून १२ लढाऊ विमाने निवडण्यात आली.


२४ फेब्रुवारी- भटिंडा येथील हवाई तळावर असणारे अर्ली वॉर्निंग जेट आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांच्या सहाय्याने मध्य भारतामधील आकाशात सराव करण्यात आला. 


२५ आणि २६ फेब्रुवारी- प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात झाली. ग्वाल्हेर येथील तळावरून मिराज २००० विमानांनी टप्प्याटप्प्याने उड्डाण केले. यानंतर भटिंडा येथील अर्ली वॉर्निंग जेट आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांनी उड्डाण केले. दुसरीकडे हेरॉन या ड्रोननेही नियोजित ठिकाण गाठले. यानंतर मिराज-२००० विमानांच्या वैमानिकांनी लक्ष्य निश्चिती केली. नियंत्रण कक्षाकडून आदेश आल्यानंतर सर्व विमानांनी कमी उंचीवरून मुझफ्फराबादच्या दिशेने उडायला सुरुवात केली. रात्री ३.२० ते ४ या काळात लेझर गाइडेड बॉम्बद्वारे (लक्ष्य अचूक साधणारे बॉम्ब) हल्ला करण्यात आला. 


२६ फेब्रुवारी- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एअर स्ट्राईकची माहिती दिली. यानंतर मोदींकडून परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेण्यात आला.