सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लांस नायक संदीप सिंग शहीद
भारत मातेने गमावला आणखी एक सुपुत्र
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तंगधर सेक्टरमध्ये काल दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र या कारवाईत भारताच्या ४ पॅरा या स्पेशल फोर्सचे जिगरबाज वीर लान्स नाईक संदीप सिंग हुतात्मा झाले. पाकिस्तानच्या हद्दीतून भारतात घुसखोरी करणाऱ्या दोन घुसखोरांवर संदीप यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. त्यानंतरच आपला देह धारातीर्थी ठेवला. संदीप सिंग यांच्यामागे पत्नी, ५ वर्षांचा मुलगा आहे. संदीप सिंग कार्यरत असलेल्या ४ पॅरानेच २०१६ साली पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते.
गावावर शोककळा
संदीप यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच आई कुलविंदर कौर बेशुद्ध झाली. पत्नी गुरप्रीत कौरचे अश्रृ थांबत नाही आहेत. वडील जगदेव सिंग यांना देखील दु:ख असहाय्य झालं आहे. संपूर्ण गावात शोककळा पसकली आहे.
सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका
संदीप सिंग 2007 मध्ये लष्करात भर्ती झाले होते. ते सध्या 4 पॅरा उधमपूरमध्ये आपलं कर्तव्य बजावत होते. तंगधारमध्ये घुसखोरीची माहिती मिळताच त्यांना तेथे पाठवण्यात आलं. संदीप सिंग यांनी पीओकेमध्ये 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये देखील महत्त्वाची भूमिका निभावली होती.
5 दहशतवाद्यांना कंठस्नान
रविवारी एलओसीवर दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यामध्ये पहिल्या दिवशी 2 दहशतवाद्यांना ठार केलं गेलं. सोमवारी देखील आणखी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पण सोमवारी झालेल्या या कारवाईत संदीप सिंग जखमी झाले होते. श्रीनगरमध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.