श्रीनगर: दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ३० जवानांचा मृत्यू झाला. साहजिकच यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले की, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठीही शब्द अपुरे पडतील. सीमेवरील चकमकी किंवा सर्जिकल स्ट्राईकने काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी रालोआ सरकार आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काहीतरी उपाय शोधला पाहिजे. जेणेकरून हा रक्तपात थांबवता येईल, असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले. 





COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामातील दहशतवादी हल्ला भारतीय सुरक्षा दलांसाठी मोठा धक्का आहे. उरीनंतर प्रथमच भारतीय लष्करावर इतका मोठा हल्ला झाला. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ३० जवान शहीद झाले आहेत. तर आणखी काही जवान जखमी झाले आहेत. 


५६ इंची छाती असणाऱे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कधी देणार- काँग्रेस


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाईकांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेला हा अठरावा मोठा दहशतवादी हल्ला आहे. या ह्ल्ल्यांना ५६ इंची छाती असणारे लोक प्रत्युत्तर कधी देणार, असा टोला रणदीप सुरजेवाला यांनी लगावला.