मुंबई : माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. दुपारी ३ नंतर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंद व्यक्त करणारा सुषमा स्वराज यांचा ट्विट अखेरचा ठरला . याच दिवसाची वाट पाहत असल्याची व्यक्त प्रतिक्रिया केली आणि काही तासांतच देह ठेवला. राजकारणासारख्या तीव्र स्पर्धा आणि काहीशा रुक्ष अशा क्षेत्रात तब्बल ४६ वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत, सुषमा स्वराज यांनी नेहमीच संवेदनशीलतेला महत्त्व दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा स्वराज यांनी म्हणूनच पाकिस्तानमधल्या असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्णांना त्यांनी भारतातल्या उपचारांसाठी मेडिकल व्हिजा मिळवून दिला. भारतातून पाकिस्तानात लहानपणीच गेलेल्या गीताला सुषमा स्वराज यांच्यामुळेच भारतात परत येता आले. याशिवाय इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नर्सेस, परदेशात अडकलेले भारतीय मजूर, तसंच परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीय महिला आणि इतरांना, परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी नेहमीच तत्परेनं मदतही केली. यामुळेच तुम्ही जरी मंगळवार अडकून पडले असाल तरीही, भारतीय परराष्ट्र मंत्रालय तुमची सुखरुप सुटका करेल असा विश्वास सुषमा स्वराज आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाबाबत व्यक्त केला जायचा. 


विचित्र योगायोग 


कायमच ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या सुषमा स्वराज यांनी काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयासंबंधी मंगळवारी संध्याकाळी सात वाजता ट्विट करून मोदी सरकारचं अभिनंदन केलं होतं. ते त्यांचं शेवटचं ट्विट ठरलं. यातला विचित्र योगायोग म्हणजे आर्टिकल ३७० रद्द झाल्याचं सुषमा स्वराज यांनी पाहिलं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यानंतरच रात्री नऊ वाजता त्यांनी देह ठेवला. विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधून आर्टिकल ३७० रद्द केलं जावं यासाठी त्या आग्रही होत्या. वेळोवेळी त्यांनी लोकसभेत त्या प्रश्नी आवाजही उठवला होता. त्याचीच साक्ष देणारं हे त्यांचं लोकसभेतलं भाषण. 


कौशल यांची मिश्किल आणि मार्मिक प्रतिक्रिया


सुषमा स्वराज यांनी राजकारणातून २०१८ निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचे पती कौशल स्वराज यांनी मोठी मिश्किल आणि तितकीच मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. यापुढे निवडणुका लढवायच्या नाहीत हा निर्णय घेतल्याबद्दल पती कौशल स्वराज यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले होते. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून म्हणजे १९७७ पासून अविरत ४१ वर्षांच्या सुषमा स्वराज यांच्या राजकीय कारकिर्दीचा संदर्भ देताना, आपणही गेली ४६ वर्षं धावत असल्याची आठवण कौशल स्वराज यांनी त्यांना करुन दिली होती. सोबतच आपण आता १९ वर्षांचे तरुण नसल्याचं सांगत, राजकारणातून निवृत्ती घेतल्याबद्दल सुषमा स्वराज यांचे आभार मानले होते.