मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिरीबामचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पथक पाहणीसाठी जिरीबामला निघालं असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुख्यमंत्री मंगळवारी जिरीबामचा दौरा करणार होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग-53 वर कोटलेन गावाजवळ अजूनही गोळीबार सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यात 2 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. त्यांना इंफाळला नेण्यात आलं आहे. 


जिरीबाम येथे मागील 2 दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री एन बीरेन सिंह मंगळवारी जिरीबाम दौऱ्यावर जाणार होते. तिथे हिंसाचारात 70 घरं, काही सरकारी कार्यालयं जाळण्यात आली आहेत. यामुळे शेकडो लोकांनी पलयान केलं आहे. 



प्रदेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. काही आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या 59 वर्षीय मेईती शेतकरी सोइबाम सरतकुमार सिंग यांचा मृतदेह सापडल्यानंतर 6 जून रोजी हिंसाचारात वाढ झाली. सरतकुमार सिंग यांचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सुरक्षेसाठी वाढीव उपाययोजना आणि संरक्षणासाठी स्वत:ला सशस्त्र करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. 


परिस्थिती झपाट्याने बिघडली आणि शेजारच्या आसामपर्यंत याचे लोण गेले. जिथे विविध जातीय पार्श्वभूमीतील अंदाजे 600 व्यक्तींनी लखीपूर, कचार जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. 


जिरीबाम हे राज्याची राजधानी इंफाळपासून 220 किमी अंतरावर आसामच्या सीमेला लागून असलेला प्रदेश आहे. जो महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग-37 ने जातो. आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या असंख्य कुकी गावांच्या उपस्थितीने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.