या शहराने पटकावला सर्वात स्वच्छ शहराचा मान, टॉप 3 मध्ये महाराष्ट्रातील हे शहर
देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणती? आज जाहीर झाली नावे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल (Swachh Survekshan Awards 2022) शनिवारी जाहीर झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadu Murmu) यांनी विजेत्यांचा सत्कार केला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता स्वच्छता अभियानांतर्गत कचरामुक्त शहराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पण मध्य प्रदेशातील इंदूरला (Indore) सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे. त्यापाठोपाठ गुजरातमधील सुरतला (Surat) दुसरा आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईचा (Navi Mumbai) तिसरा क्रमांक मिळाला आहे.
सर्वेक्षणानंतर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वात वर मध्य प्रदेशचे नाव आहे, ज्याला स्वच्छ सर्वेक्षण सन्मान 2022 देण्यात येणार आहे. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. यंदा इंदूर आणि सुरत मोठ्या शहरांच्या श्रेणीत आहेत, तर विजयवाडा या शहरांची जागा यावेळी नवी मुंबईने घेतली आहे.
देशातील 4,354 शहरांचे सर्वेक्षण
2016 मध्ये सुरू झालेल्या या स्वच्छता सर्वेक्षणात 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. सात वर्षांत हा आकडा चार हजारांहून अधिक झाला आहे. यावेळी स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत स्वच्छतेच्या विविध मापदंडांच्या आधारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे (ULB) निरीक्षण आणि क्रमवारीसाठी आयोजित केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाची ही 7 वी आवृत्ती होती. यावर्षी 4,354 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
नवी मुंबईचा तिसरा क्रमांक
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021- 2022 मध्ये नवी मुंबई महापालिकेला देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. दिल्ली येथे राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी प्रथम, छत्तीसगडचे पाटण (एनपी) आणि महाराष्ट्रातील करहार या शहरांचा क्रमांक लागतो. त्याच वेळी, 1 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हरिद्वारला सर्वात स्वच्छ गंगा शहर घोषित करण्यात आले, त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक लागतो. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगा शहरांमध्ये बिजनौर हे पहिले शहर होते. त्यापाठोपाठ अनुक्रमे कन्नौज आणि गढमुक्तेश्वर यांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील देवळालीला हे देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा मान मिळाला आहे.