वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण
स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते.
नवी दिल्ली : झारखंडमधील घटनेनंतर स्वामी अग्निवेश यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. शुक्रवारी अग्निवेश हे दिल्लीत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. दिल्लीतील दिनदयाल मार्गावरुन जात असताना त्यांना काही तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या व्हिडिओत एक महिला देखील अग्निवेश यांना मारहाण करत असताना दिसत आहे. ‘अग्निवेश परत जा’अशा घोषणा या तरुणांनी दिल्या. स्वामी अग्निवेश हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेच्या व्हिडिओत तरुणांचा घोळका अग्निवेश यांना मारहाण करताना दिसत आहे.
स्वामी अग्निवेश यांना गेल्या महिन्यात झारखंडमधील पाकूर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अग्निवेश यांनी गोमांस खाण्याच्या समर्थनार्थ तसेच नक्षलवादासंदर्भात केलेल्या विधानांमुळे भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला होता.