देश अस्वच्छ करणारांना `वंदे मातरम` बोलण्याचा हक्क नाही: मोदी
`स्वच्छ भारत अभियान` आणि `वंदे मातरम` यांची सांगड घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अस्वच्छ करणारांची कानउघडणी केली आहे. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारणारांना `वंदे मातरम` म्हणण्याचा काहीच अधिकार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : 'स्वच्छ भारत अभियान' आणि 'वंदे मातरम' यांची सांगड घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अस्वच्छ करणारांची कानउघडणी केली आहे. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारणारांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा काहीच अधिकार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे.
देशभरातील युवकांना 'यंग इंडिया'च्या माध्यमातून संबोधीत करताना पंतप्रधान सोमवारी (११ सप्टेबर) बोलत होते. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाला आज १२५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मोदी बोलत होते. या वेळी बोलताना, पंतप्रधांनांनी विविध मुद्द्यांना हात घातला. पण, भाषणादरम्यान, ते 'वंदे मातरम'च्या मुद्द्यावरून गंभीर झाले.
'वंदे मातरम'वरून बोलताना मोदी म्हणाले, 'मी येथे आलो तेव्हा सर्वांनी मोठ्या ताकदीने वंदे मातरम म्हटले. वंदे मातरम म्हणताच अंगावर शहारे येतात. पण, एकदाच नव्हे तर, ५० वेळा विचार करा! खरोखरच आपणास वंदे मातरम म्हणण्याचा हक्क आहे काय? मला हे माहिती आहे की, माझे बोलणे अनेकांना लागण्याची शक्यता आहे. पण, आपण पान खाऊन भारत मातेवर पिचकारी मारणार आणि पुन्हा वंदे मातरम बोलणार ? रिकाम्या जागा, रस्ते, सार्वजनीक ठिकाणे आदींवर आपण कचरा फेकणार आणि वंदे मातरम म्हणणार?, या देशात वंदे मातरम म्हणण्याचा जर पहिला हक्क कोणाचा असेल तर, तो या सफाई काम करणाऱ्यां नागरिकांचा आहे', असेही पंतप्रधांनी म्हटले आहे.