`टी-सीरीज` जगातील पहिल्या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल
स्वीडिश यूट्यूब चॅनेल `प्यूडायपाय`ला PewDiePie मागे टाकत `टी-सीरीज` पहिला क्रमांक पटकावला आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून म्यूझिक कंपनी आणि भारतीय फ्लिम प्रोडक्शन हाऊस 'टी-सीरीज'ची मोठी चर्चा होती. आता T-Series जगातील पहिल्या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल बनले आहे. 'टी-सीरीज'ने स्वीडिश यूट्यूब चॅनेल 'प्यूडायपाय'ला PewDiePie मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भूषण कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्यांनी 'टी-सीरीज' जगातील पहिल्या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल बनण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. इथंपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. वडिल गुलशन कुमार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या चॅनेलची सुरूवात केली होती. आज हे चॅनेल तुमच्याशी, संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे' भूषण कुमार यांनी सांगितले.
'टी-सीरीज'चे जवळपास 90.68 दशलक्ष सब्सक्रायब्रर्स आहेत. तर 'प्यूडायपाय'चे 90.47 दशलक्ष सब्सक्रायब्रर्स आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही चॅनेलमध्ये कमालीची स्पर्धा होती. अखेर या स्पर्धेत 'टी-सीरीज'ने बाजी मारली. 'टी-सीरीज'चे मालक भूषण कुमार यांनी सोशल मीडियावर #BharatWins हे अभियान चालवले होते. भूषण कुमार यांनी सर्वांना 'टी-सीरीज'ला सर्वाधिक सब्सक्राईब असणारे चॅनेल बनवण्यासाठी मदत करण्याचे सांगितले होते.