लोकसंख्यावाढ आटोक्यात आणण्यासाठी बाबा रामदेव यांनी सुचवली नामी शक्कल
अलिगढमध्ये पतंजली परिधानच्या नव्या दुकानाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांवर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली - दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांना निवडणुकीला उभे राहण्याचीही परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. अशा लोकांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ नका. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करू नका, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.
अलिगढमध्ये पतंजली परिधानच्या नव्या दुकानाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांवर जोरदार टीका केली. दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांच्या सर्व सुविधा काढून घेतल्या पाहिजेत. त्यांना सरकारी नोकरीसुद्धा नाकारली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे, असे झाले तरच देशाची लोकसंख्या कमी होऊ शकते, असे बाबा रामदेव म्हणाले.
वाढती लोकसंख्या देशासमोरील मोठा प्रश्न असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी हे उपाय तातडीने योजले पाहिजेत. दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देणारा नागरिक कोणत्याही धर्मातील असू दे. तो मुस्लिम किंवा हिंदू असला, तरी त्याच्यावर निर्बंध घातले गेलेच पाहिजेत. तरच त्याचा परिणाम दिसून येईल. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येही बाबा रामदेव यांनी अशाच स्वरुपाचे विधान केले होते. त्यावेळी त्यांनी अविवाहित राहणाऱ्यांना विशेष दर्जा दिला जाण्याची मागणीही केली होती. हरिद्वारमध्ये योगपीठामध्ये त्यांनी ही मागणी केली होती. आता परत एकदा त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या नागरिकांना सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले, तरच लोकसंख्यावाढ नियंत्रणात येण्यास मदत होईल. त्यासाठीच अशा लोकांवर कडक निर्बंध घातले पाहिजेत, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.