`पतंजली`बाबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ हटविण्याचे फेसबुक, युट्यूबला आदेश
ज्या नोंदणीकृत खात्यावरून हा ब्लॉग पोस्ट करण्यात आला त्या लोकांची नावांचाही खुलासा करावा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.
नवी दिल्ली : सेशल मीडिया साईट्स फेसबुक, गुगल आणि युट्यूबवरून एक व्हिडिओ ब्लॉग हटविण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. ज्यात योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या पीठाला गुणात्मकदृष्ट्या खालचा दर्जा असल्याचे दाखविण्यात आले होते. न्यायमुर्ती आर. एस. एन्डलॉ यांनी निर्णय देताना तीनही सोशल मीडिया साईट्सना ब्लॉग हटविण्याबाबतचे आदेश दिले.
तामिळ भाषेत होता व्हिडिओ ब्लॉग
दरम्यान, ज्या नोंदणीकृत खात्यावरून हा ब्लॉग पोस्ट करण्यात आला त्या लोकांची नावांचाही खुलासा करावा असेही आदेश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर पुढील सुनावनी १५ मे या दिवशी होणार आहे. पतंजलीने आक्षेप घेत तमिळ भाषेत बनविण्यात आलेल्या व्हिडिओ ब्लॉग हटविण्यात यावा अशी मागणी एका याचिकेद्वारे केली होती. ज्यावर कोर्टाने हा निर्णय दिला. या व्हिडिओत आयटीसीच्या 'आशीर्वाद' पीठालाही खालच्या दर्जाचे असल्याचे म्हटले होते. पतंजलीने आक्षेप घेतला होता की, दोन्ही ब्रांडच्या पीठांना ब्लॉगमध्ये रबर असे संबोधण्यात आले होते.
...म्हणून पतंजलीने मागितली न्यायालयात दाद
पतंजीलकडून बाजू मांडताना अॅडोकेट राजीव नायर यांनी न्यायालयात सांगितले की, आयटीसीने बंगळुरूच्या न्यायालयात आगोदरच अंतरीम स्टे ऑर्डर घेतली आहे. नायर यांनी पुढे सांगितले की, या सोशल साईट्सना आम्ही हा व्हिडिओ काढण्याबाबत विनंती केली होती. मात्र, हे व्हिडिओ काढले गेले नाहीत. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागितली.