कोरोना प्रतिबंधक लसीचे 11 डोस घेणं वृद्ध व्यक्तीला पडलं महागात!
लसीचे 11 डोस घेतल्याचा दावा केल्याप्रकरणी हा व्यक्ती दोषी आढळला आहे.
बिहार : देशात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे तब्बल 1 डोस घेतले होते. मात्र हे लसीचे 11 डोस घेणं त्याला महागात पडलं आहे. लसीचे 11 डोस घेतल्याचा दावा केल्याप्रकरणी हा व्यक्ती दोषी आढळला असून मधेपुरा पोलिसांनी वृद्धाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारीनंतर या व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मधेपुरा जिल्ह्यातील 84 वर्षीय ब्रह्मदेव मंडल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेळा कोरोनाची लस घेतली होती. दरम्यान याचा खूप फायदा झाल्याचंही या व्यक्तीने सांगितलं होतं. लस घेतल्यानंतर त्याच्या गुडघ्याचा त्रास कमी झाला. यामुळे त्याने लसीचे इतके जास्त डोस घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लसीचा 12वा डोस घेण्यासाठी हा व्यक्ती चौसा केंद्रात गेला होता. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्याला ओळखलं. नंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
ब्रह्मदेव मंडलचा दावा आहे की, त्यांनी कोरोनाची लस घेण्यास सुरुवात केली तेव्हापासून तो आजारी पडला नाही. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होतेय.
पुरेनी पोलिस स्टेशनचे एसएचओ म्हणाले की, या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तक्रार करण्यात आली. यानंतर कारवाई करत आम्ही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आरोपी ब्रह्मदेव मंडल यांनी 13 फेब्रुवारी 2021 ते 4 जानेवारी 2022 दरम्यान अनेक वेळा कोरोना प्रतिबंधक लसीचे 11 डोस घेतले. यावेळी त्याने वेगवेगळी ओळखपत्रं वापरली असल्याची माहिती. आरोपीने आरोग्य कर्मचाऱ्यांची दिशाभूल केलीये.
यापूर्वी मधेपुराचे सिव्हिल सर्जन डॉ अमरेंद्र प्रताप शाही यांनी सांगितलं होतं की, ब्रह्मदेव मंडल यांचा दावा खरा आहे की खोटा याचा तपास सुरु आहे. आम्ही रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासत आहोत. हा दावा खरा ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.