सतना, मध्यप्रदेश : एका सामान्य कुटुंबातील अवघा चार वर्षांचा एक चिमुरडा अनेकांच्या चर्चेचा विषय बनलाय... केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर... या चिमुरड्याचं अजब-गजब बुद्धीकौशल्य अनेकांना आश्चर्यचकीत करतंय. देश-विदेशाच्या राजधान्यांची नावं त्याच्या तोंडावर आहेत... इतकंच काय तर रामचरित मानस असो की हनुमान चालिसा... संस्कृतचे अनेक श्लोक त्याच्या तोंडात आहेत. या चिमुरड्याचं सामान्य ज्ञानही आपल्याहून मोठ्या मुलांहून अधिक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चिमुरड्याचं नाव आहे तक्ष सिंह... सताना जिल्ह्याच्या घुघुआर गावात तो राहतो. देशातील प्रमुख नद्या, सामान्य ज्ञान किंवा इंग्रजी अक्षर... आपल्या तोतऱ्या बोलीनं तो अनेकांना मोहून टाकतो.


तक्षचा जन्म १० ऑक्टोबर २०१५ रोजीचा... त्याचे वडील धिरेंद्र सिंह शेतकरी आहेत तर आई इंदू या गृहिणी आहेत. तक्ष सध्या नर्सरीमध्ये शिकतोय. आई-वडील दोघांचही शिक्षण बारावीपर्यंत झालंय. आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं सहजा-सहजी देता येणार नाहीत, त्या प्रश्नांची उत्तरं तक्ष लगेचच देऊ शकतो. 



तक्षच्या आई-वडिलांनाही आपल्या चिमुकल्याचं बुद्धिकौशल्याचं भलतंच कौतुक आहे. तक्षला चांगल्या शाळेत घालून त्याच्या बुद्धीला आणखीन धार देण्याची इच्छा त्यांनाही आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही. परंतु, तक्षला जे आपण देऊ शकतो ते देण्याचा हरएक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.