डीएमके नेत्या कनिमोळी यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा
डीएमके नेत्या कनिमोळी थुतूकुडी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.
तामिळनाडू : डीएमके नेत्या कनिमोळी यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. एकूण १० अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. या कारवाईनंतर संतप्त झालेल्या डीएमकेच्या समर्थकांनी प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. दरम्यान, कनिमोळी यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यावरुन कनिमोळींचे बंधू आणि डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे.
आयकर विभागाकडून तमिळनाडूतील तूतीकोरिनमध्ये हा छापा टाकण्यात आला. डीएमके प्रमुख एमके स्टालिन यांनी तामिळनाडूचे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष तमिलिसाई सौंदराराजन यांच्या घरी कोट्यवधी रुपये ठेवले आहेत परंतु त्यांच्या घरी कोणताही छापा टाकला जात नसल्याचा आरोप केला होता. एमके स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत मोदी निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी आयकर विभाग, सीबीआय आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांचा वापर करत असल्याचा आरोपही केला आहे.
डीएमके नेत्या कनिमोळी थुतूकुडी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यसभा सदस्य कनिमोळी प्रदेश अध्यक्ष तमिलिसाई सौंदराराजन यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.