मुलाला कॉलेजमध्ये फी भरता यावी म्हणून आईने दिला जीव; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद
Tamil Nadu News : हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलाच्या फीसाठी आईने आपल्या प्राणांची आहुती दिल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Shocking News : मुलांसाठी आईच्या प्रेमाला कुठलीच सीमा नसते. मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. याचे ताजे उदाहरण तामिळनाडू (Tamilnadu) पाहायला मिळालं आहे. तामिळनाडूमध्ये एका महिलेने आपल्या मुलाची कॉलेजची फी (College Fees) भरण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. कॉलेजमध्ये अभ्यासाची तयारी करणाऱ्या मुलाही अकाली आई गमवावी लागली आहे. मुलाच्या कॉलेजच्या फीसाठी एका आईने जीव दिल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या आईने चालत्या बससमोर उडी घेतली जेणेकरून तिच्या मृत्यूनंतर मुलाला भरपाई मिळेल आणि त्याला कॉलेजची फी भरता येईल. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले आहे.
बसची धडक बसल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. पापथी (45) असे महिलेचे नाव असून ती जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगार होती. आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी तामिळनाडू सरकारकडून आर्थिक मदत मागण्यासाठी महिलेने 28 जून रोजी चालत्या बससमोर उडी मारली. सरकारी नुकसानभरपाई मिळवण्यासाठी महिलेची दिशाभूल करताना कोणीतरी ही पद्धत तिला सांगितल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत महिलेने हे पाऊल उचलण्यास होकार दिला होता. त्यानंतर तिने धावत्या बससमोर उडी घेतली आहे.
तामिळनाडूतील सेलम येथे घडलेल्या भयंकर घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. महिलेला विश्वास होता की तिच्या बलिदानामुळे तिच्या मुलाची 45,000 रुपये कॉलेजची फी भरण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. पापथी केवळ एक मेहनती महिलाच नव्हती तर शिक्षणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी एक प्रेमळ आई देखील होती. एक सफाई कर्मचारी म्हणून तिने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. तथापि, मुलाच्या कॉलेजच्या फीच्या ओझ्यामुळे तिच्यावर मोठा आर्थिक ताण पडला होता. यातूनच तिने हे पाऊल उचललं.
मृत्यूनंतर सरकारकडून भरपाई मिळेल असे सांगत कोणीतरी तिची दिशाभूल केल्यानंतर पापथीने हे टोकाचे पाऊल उचलले. रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाल्यास तिला राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल, असे कोणीतरी पापथी यांना सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ही पापथी गेल्या 15 वर्षांपासून एकटीच मुलांचे संगोपन करत होती.
दुसऱ्यांदा केला होता जीव देण्याचा प्रयत्न
पापथीने एकाच दिवशी एकदा नव्हे तर दोनदा रस्ते अपघातात जीव देण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिलेने पहिल्यांदा बससमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला दुचाकीने धडक दिल्याचे बोलले जात आहे. काही वेळाने तिने पुन्हा प्रयत्न केला आणि बसच्या धडकेत तिचा मृत्यू झाला.