Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार
Truck Accident VIDEO: 3 ट्रकच्या धडकेमध्ये एक कारही सापडली आणि तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता एवढी होती की एक ट्रक थेट घाटातील ब्रिजवरुन खाली पडला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Tamil Nadu Truck Accident VIDEO: तामिळनाडूमधील एक धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृ्तूय झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सदर अपघातामध्ये 3 ट्रक आणि एका कारची हायवेवर भरधाव वेगात असताना धडक झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 24 जानेवारी रोजी तामिळनाडूमधील धर्मपुरी येथील थोपपूर घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठ्याप्रमाणात वाहूतक कोंडी
हायवेवरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या अपघातामुळे हायवेवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एकमेकांना धडकेलेल्या या 4 वाहनांनी पेट घेतल्याने अनेक तास हा हायवे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
ट्रकच पुलावरुन खाली पडला
धर्मापुरीवरुन सालेमला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. एका ट्रेलरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा लांबलचक ट्रक रस्त्यावरुन भरधाव वेगात धावणाऱ्या अनेक गाड्यांना आदळाला. या ट्रेलर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रेलर बाजूच्या धावत्या ट्रकवर आदळला. या 2 ट्रकची धडक झालेली असतानाच तिसरा ट्रकही त्यांना येऊन आदळला. याचदरम्यान मागून येणारी कारही या तिन्ही ट्रकच्यामध्ये पूर्णपणे चेपली गेली. हे सारं काही इतक्या वेगाने आणि कमी वेळेत झालं की कोणाला काही कळेच नाही. या अपघाताची भीषणता यावरुनच लक्षात येते की धडक झाल्यानंतर एक ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला.
मृतांची ओळख पटवण्याचं काम
अपघातानंतर ट्रक आणि कारने पेट घेतला. अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आग विझवली. मात्र या अपघातामध्ये एकूण चौघांना आपले प्राण गमावावे लागले. या अपघातामध्ये मोठ्या आकाराचे ट्रक अपघातग्रस्त झाल्याने संपूर्ण मार्गिकाच बंद पडली. मरण पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. जखमी व्यक्तींना धर्मपुरी सरकारी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
मृतांची संख्या वाढण्याची भिती
जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. मरण पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस यांची ओळख पटवण्यासाठी डीएनएचे नमुने घेऊन ठेवणार असल्याचे समजते. सध्या सीसीटीव्हीबरोबरच प्रत्यक्ष अपघात झाला त्यावेळी उपस्थित असलेले लोकं, बचावलेल्या लोकांचा जबाब नोंदवून नेमकं घडलं काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.