रायबरेलीत भीक मागणारा निघाला तमिळनाडूचा करोडपती!
रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी `आधार कार्ड`नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
नवी दिल्ली : रस्त्यावर आणि दारोदारी फिरून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी 'आधार कार्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावलीय.
उत्तरप्रदेशच्या रायबरेलीच्या रालपूर शहरात भुकेनं व्याकूळ झालेल्या एका भिकाऱ्याच्या आधार कार्ड आणि एफडी पेपर्समध्ये धक्कादायक खुलासा झाला.
रालपूरमधल्या एका शाळेचे स्वामी भास्कर स्वरुप महाराज यांनी या भिकाऱ्याला पाहिलं... या भिकाऱ्यानं इशाऱ्यानंच त्यांच्याकडे जेवणाची मागणी केली... पण तो काहीही सांगण्याच्या, समजण्याच्या मनस्थितीत नव्हता.
महाराजांनी या भिकाऱ्याला भोजन दिलं... त्याच्याकडे असलेल्या वस्तू पाहताना त्याच्या सामानात आधार कार्ड आणि करोडो रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिटचे पेपर सापडले.
आधारकार्डावर दिलेल्या माहितीवरून मुथय्या नाडार नावाची ही व्यक्ती तमिळनाडूची रहिवासी असल्याचं समजलं. इतकंच नाही तर या व्यक्तींच्या नावे करोडोंची संपत्ती असून तो एक व्यावसायिक असल्याचं समोर आलं.
यानंतर महाराजांनी व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी रेल्वेनं तीर्थ यात्रेसाठी निघालेले मुथय्या रस्ता विसरहले... त्यांची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे ते सहा महिन्यांपर्यंत घरी संपर्क साधू शकले नव्हते.