नवी दिल्ली: राफेल कराराबाबत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या बाजुने वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारीक अन्वर यांनी बंड पुकारले आहे. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वासह खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्य़ामुळे  ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीसही होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चोर' म्हटले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीसाठी धावून गेले. पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही अशी पाठराखण पवारांनी मोदींची केली. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नाही, असे विधान करून पवारांनी एकप्रकारे मोदींची पाठराखण केली होती. 


यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याची सारवासारव केली होती. मात्र, यावरुन मोदी आणि पवार यांच्यातील मैत्रीची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. मात्र, यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. याच वक्तव्याचा आधार घेत अन्वर यांनी राजीनामा दिला आहे.  


तारिक अन्वर यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली होती. १९८०मध्ये ते सर्वप्रथम लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी युवक काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवलं होतं. १९९९ साली पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड करत त्यांनी काँग्रेस सोडली. मागील निवडणुकीत बिहारमधील कटिहार लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते.