Business News : भारतीय उद्योग समुहामध्ये आघाडीचा आणि अतिशय आदरानं ज्या उद्योगसमुहाचं नाव घेतलं जातं तो समुहं म्हणजे TATA Group. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात आपल्या उद्योगाची पाळंमुळं असणाऱ्या या टाटा समुहानं आजवर अनेकांना रोजगार दिला आहे. जाणून आश्चर्य वाटेल, पण 2023 मधील अधिकृत आकडेवारीनुसार या उद्योगसमुहात तेव्हापर्यंत 1,028,000 इतके एकूण कर्मचारी कामावर रुजू असल्याचं सांगण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादी महागडी वस्तू असो किंवा अगदी घरातील भाजीपाला किंवा मीठ मोहरी असो. प्रत्येक वेळी 'टाटा' हे नाव या न त्या कारणानं कायमच समोर येत राहिलं. निमित्त ठरलं ते म्हणजे भारतीय उद्योग जगतातील विविध शाखांमध्ये सक्रिय असणारा टाटा उद्योग समूह आणि त्यांच्या जवळपास 100 कंपन्या. मीठ, पाणी, कडधान्य, कपडे, घड्याळं, वाहनं या आणि अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये टाटा समुहानं उडी घेतली आणि यशाची शिखरं गाठली. 


टाटा समुहाची धुरा हाती घेत या समुहाला यशाच्या परमोच्च शिखरापर्यंत नेण्यात मोलाचा वाटा राहिला तो म्हणजे रतन टाटा यांचा. TATA Sons च्या अध्यक्षपदी राहत आपल्या नेतृत्वाखाली उद्योग समुहाला कमालीचं पुढे नेणाऱ्या रतन टाटा यांनी कमालच केली. एकिकडे उद्योग समुह पावलोपावली यशस्वी होत होता आणि दुसरीकडे रतन टाटा यांचाही विकास होतच राहिला. पण, त्यांनी पदभार सोडल्यानंतर या समुहाची सर्व सूत्र कोणाच्या हाती गेली माहितीय? 


देशातील पहिलं लक्झरी हॉटेल असो किंवा मग पहिली विमानसेवा पुरवणारी कंपनी. टाटांच्याच नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. 2023-24 च्या आर्थिक वर्षामध्ये टाटा समुहाची आर्थिक उलाढाल 165 अब्ज डॉलर इतकी होती. तर, कर्मचारी संख्या 1,028,000 वर पोहोचली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएस ही टाटा समुहातीलच एक अशी कंपनी आहे ज्यामध्ये 6,14,795 कर्मचारी काम करतात. 


रतन टाटा ठरले परीस... 


जमशेदजी टाटा यांनी सुरु केलेल्या आणि पाया रचलेल्या या उद्योग समुहामध्ये रतन टाटा यांच्यावर जेव्हा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा जणू दुप्पट वेगानं समुह प्रगतीपथावर निघाला. 1991 मध्ये टाटा ग्रुपची जबाबदारी हाती घेतल्यानंतर नफा एके नफा हेच सूत्र कंपनीनं अनुभवलं ते अगदी 2012 पर्यंत. रतन टाटा यांनी पदभार सोडल्यानंतर दिवंगत सारयस मिस्त्री यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानंतर 2016 मध्ये पुन्हा ही जबाबदारी रतन टाटा यांच्या हाती आली. पण, अखेर 2017 मध्ये त्यांनी पुन्हा हे पद सोडत ही संपूर्ण जबाबदारी नटराजन चंद्रशेखर यांच्यावर सोपवली. असं असलं तरीही टाटा ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी अद्यापही रतन टाटा यांच्याकडेच असून, ते निर्णय प्रक्रियेमध्येही चंद्रशेखर यांना सहकार्य करतात.


हेसुद्धा वाचा : BMW, ऑडिला टक्कर देणाऱ्या व्हिंटेज कार आठवतायत? Photo पाहून सांगा नावं 


शेअर बाजारात लिस्ट झालेल्या टाटांच्या महत्त्वाच्या कंपन्या 


  • Trent Ltd

  • Tata Investment Corp

  • Tata Metalikes

  • Tata Elxsi

  • Nelco Ltd

  • Tata Tech

  • Rallis India 

  • Indian Hotels Company

  • Tata Consumer Product

  • Tata Communication

  • Voltas Ltd 

  • TCS

  • Tata Steel

  • Tata Motors

  • Titan Company

  • Tata Chemicals 

  • Tata Power 


इतिहासात डोकावताना... 


देश स्वतंत्र होण्याआधी कैक वर्षे म्हणजेच 1868 मध्ये एका ट्रेडिंग फर्मच्या रुपात टाटा उद्योग समुहाची सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या अनेक शाखा, अनेक नावांनी सुरू झाल्या आणि व्यवसाय क्षेत्रातील अनेक उपशाखांमध्ये या कंपनीच्याच नावाचा डंका वाजला. येत्या काळात या समुहामध्ये रतन टाटा यांच्या पुढच्या पिढीचा अर्थात त्यांचे बंधू नोएल टाटा यांच्या मुलांचाही प्रवेश झाल्यामुळं आता ही नवी पिढी हे शिवधनुष्य पेलते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.