Job News : मागील काही वर्षांपासून आयटी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या आकड्यानं वाढली आहे. विविध देशी आणि परदेशी कंपन्यांनकडून तरुणांना आणि नवोदितांना मिळणाऱ्या संधी पाहता या क्षेत्राकडेच अनेकांचा कल दिसून येत आहे. (IT Sector) आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पगार आणि भविष्यात मिळणाऱ्या संधी पाहता या क्षेत्राला अनेकांचं प्राधान्य दिसून येतं. पण, आता मात्र तुमची ही विचारसरणीच बदलू शकते. कारण, भारतातील एका अग्रगण्य आणि बड्या IT कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (टीसीएस)कडून मागील काही दिवासांपासून सुरु असणारी हायब्रिड पद्धतीनं काम करण्याची मुभा बंद करण्याचा निर्णय कंपनी 1 ऑक्टोबरपासून अंमलात आणणार आहे. एका अंतर्गत प्रणालीद्वारे Email करत कंपनीकडून कर्मचाऱ्यांना आठवड्याचे पाच दिवस ऑफिसमध्ये हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या काळात IT क्षेत्रामध्ये Work From Home पूर्णपणे बंद केले जाणार असल्याचेच हे संकेत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


टीसीएसमधील बऱ्याच विभागांच्या मॅनेजरकडून त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा बंद होणार असल्याची माहिती ई- मेलच्या माध्यमातून देण्यात आली. मनीकंट्रोलनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. असं असलं तरीही कंपनीकडून काही प्रसंगी कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली जाणार असल्याचंही इथं म्हटलं गेलं. 


TCS कडून मागील काही काळापासून कर्मचाऱ्यांसाठी काही नियम आखण्यात आले होते. जिथं कर्मचाऱ्यांना वेळापत्रकाचं पालन करणं अनिवार्य असल्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. प्राथमिक स्तरावर कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस ऑफिसमध्ये येणं बंधनकारक होतं. पण, बऱ्याच कर्मचाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान कंपनीच्या या सक्तीच्या भूमिकेबाबत सध्या कंपनीकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सध्या कंपनी 'सायलेंट पिरियड'मध्ये आहे, इतकंच सांगण्यात येत आहे.


हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा 


कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या या सर्व निर्णयांचा परिणाम  615,318 कर्मचाऱ्यांवर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता येत्या काळात कंपनीनं आखून दिलेल्या या नियमाचं पालन कोण करतं आणि नियमांचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.