नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू यांनी झटका दिला आहे. तेलगू देसमच्या गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिलाय. केंद्रातील भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय तेलगू देसम पक्षानं जाहीर केलाय. चंद्राबाबू नायडूंच्या या घोषणेनंतर टीडीपीच्या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजनामे सोपवले आहेत. 


सत्तेतून बाहेर पण एनडीएमध्ये कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी एनडीएमध्ये कायम आहोत, असं वक्तव्य राजीनामा दिलेले राज्यमंत्री वाय.एस.चौधरी यांनी केलं आहे. कोणतंही मंत्रीपद न स्वीकारता एनडीएमध्ये राहण्यात काहीही गैर नसल्याचंही चौधरी म्हणाले.


सरकारला चंद्राबाबूंचा झटका


आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून सावत्र वागणूक मिळत असल्याची टीका करत, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएबाहेर पडण्याची घोषणा मंगळवारी रात्री केली. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री अशोक गणपती राजू आणि विज्ञान तंत्रज्ञानमंत्री वाय. एस. चौधरी या दोन्ही मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळं मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये पहिली फूट पडलीय.


आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा नाही!


तेलंगणा राज्य वेगळं झाल्यानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी टीडीपीनं लावून धरलीय. पंतप्रधान मोदींनी तसं आश्वासन 2014 मध्ये दिलं होतं. यासाठी नायडूंनी तब्बल 29 वेळा दिल्लीवारी केली. पण केंद्राकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आंध्रच्या महसुली उत्पन्नात 16 हजार कोटींची तूट आली. ती भरून देण्याबाबत केंद्रानं काहीच पावलं उचलली नाहीत. अमरावतीत नवी राजधानी उभारण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात अपेक्षित निधी दिला नाही, यामुळं टीडीपी नाराजी होती.


सरकारची बाजू मांडण्याचा खटाटोप


केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी याबाबत सरकारची बाजू मांडण्याचा खटाटोप केला. महसुली उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी आंध्रला 4 हजार कोटी रूपये दिले. आणखी 138 कोटी देणे बाकी आहेत. अमरावतीत नवी राजधानी तयार करण्यासाठी 2500 कोटी रूपये दिलेत, असं त्यांनी सांगितलं. मात्र आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य करता येणार नाही. त्याऐवजी केंद्राच्या सगळ्या योजनांमध्ये 90 टक्के निधी देऊ, असं आश्वासन जेटलींनी दिलं.


चंद्राबाबूंचं समाधान नाही


मात्र यामुळं चंद्राबाबूंचं समाधान होऊ शकलं नाही. त्यांनी थेट सरकारबाहेर पडण्याची घोषणा केली. या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करण्याचा प्रयत्न आपण केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असा दावा चंद्राबाबूंनी यावेळी केला.


भाजपच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा


तेलगू देसमच्या 16 खासदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर आंध्र सरकारमधील भाजपच्या दोघा मंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. टीडीपी आणि भाजप यांच्यातील वाद पराकोटीला गेल्याचं यामुळं स्पष्ट दिसतंय. चंद्राबाबूंनी एनडीएमधील घटकपक्षांच्या नाराजीला तोंड फोडलंय.