मुंबई : राष्ट्रपती निवडणुकीसाठी अवघे सात दिवस उरलेत. 18 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा वाढत चालला आहे. यामध्ये आता आणखी एका पक्षाचा समावेश झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) ने द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुर्मू यांची उमेदवारी अधिक भक्कम झाली आहे. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा मागे पडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आतापर्यंत भाजप, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, जनता दल सेक्युलर, शिरोमणी अकाली दल, जेडीयू, एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, अपना दल (सोनेलाल), निषाद पार्टी, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनी पाठिेंबा दर्शवला आहे. NPP, NPF, MNF, NDPP, SKM, AGP, PMK, AINR काँग्रेस, जननायक जनता पार्टी, UDP, IPFT, UPPL या पक्षांनी ही त्यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील सपा आघाडीचा भाग असलेला ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्षही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतो. समाजवादी पक्षाचे आमदार शिवपाल सिंह यादव यांनीही मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केली आहे. रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैय्या यांचा जनसत्ता दल देखील एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे.


विरोधी पक्षात असूनही बीजेडी, वायएसआर काँग्रेस, जनता दल सेक्युलर, अकाली दल, टीडीपी आणि बहुजन समाज पक्षाने एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. या सर्वांची 6.50 लाखांहून अधिक मते आहेत. हा आकडा जिंकण्यासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे.
 
सिन्हा यांना कोणाचा पाठिंबा


यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, सीपीआय, सीपीआय(एम) समाजवादी पक्ष, आरएलडी, आरएसपी, टीआरएस, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय, आरजेडी, केरळ काँग्रेस (एम) अशा पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. यशवंत यांच्याकडे सध्या सुमारे तीन लाख 89 हजार मते आहेत. केरळमधील लहान-मोठ्या सर्वच पक्षांनी यशवंत सिन्हा यांनाच पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना येथे एक मतही न मिळण्याची शक्यता आहे.


अनेक विरोधी पक्षांनी सिन्हा यांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये बीजेडी, वायएसआर काँग्रेस, जनता दल सेक्युलर, अकाली दल, टीडीपी, बहुजन समाज पक्ष यांचा समावेश आहे.


या पक्षांची भूमिका अजून गुलदस्त्यात


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बहुतांश प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र अजूनही काही पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राज्यसभेचे 10 खासदारही आहेत. राष्ट्रपती निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.


याशिवाय झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा यांनीही अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र, JMM द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतो, असे मानले जात आहे. शिवसेनेनेही अंतर्गत कलहामुळे आतापर्यंत पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र, भाजपसोबत सरकार स्थापन करणारे शिंदे गटाचे आमदार आणि बहुतांश खासदार एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देतील, असे मानले जात आहे.
 
दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले खासदार, सर्व राज्यांचे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. त्यांच्या मतांची एकूण किंमत 10 लाख 86 हजार 431 आहे. अशा प्रकारे विजयासाठी निम्म्याहून अधिक मतांची आवश्यकता आहे. म्हणजे उमेदवाराला विजयासाठी किमान 5 लाख 43 हजार 216 मतांची गरज आहे.


सध्या भाजपकडे सुमारे सहा लाख 50 हजार मते आहेत. म्हणजे विजयासाठी राखून ठेवलेल्या मतांपेक्षा जास्त, तर सिन्हा यांना सुमारे तीन लाख 89 हजार मते मिळणार आहेत. म्हणजे विजयासाठी निश्चित मत मूल्यापेक्षा सुमारे दीड लाख कमी. अशा स्थितीत द्रौपदी मुर्मू ऐतिहासिक विजयाची नोंद करू शकतात, असे आतापर्यंत दिसणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.