वर्गशिक्षिका विद्यार्थ्यावर रागवली आणि येऊ लागले अश्लिल फोन कॉल्स
अश्लिल फोन कॉल्स आणि वर्ग शिक्षिका रागवण्याचं कनेक्शन पोलिसांनी असं शोधून काढलं
नवी दिल्ली : वर्गात शिक्षिका रागावल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने असा सूड उगवला की ऐकून पोलीसही चक्रावले. बारावी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्ग शिक्षिकेचं चक्क बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. यानंतर या अकाऊंटवरुन या विद्यार्थ्याने अश्लिल फोटो, व्हिडिओ शेअर केले. धक्कादायक म्हणजे त्याने वर्ग शिक्षिकेचा मोबाईल नंबरही इन्स्टाग्रामवर शेअर केला.
काही दिवसांनी या महिला शिक्षिकेला अचानक अनोळखी क्रमांकावरुन अनेक फोन येऊ लागले. फोन करणारे अश्लिल संभाषण करु लागले. अचानक होत असलेल्या या प्रकाराने शिक्षिकेला मोठा धक्का बसला. याबाबत शिक्षिकेने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत तात्काळ पावलं उचलत शोध सुरु केला.
सायबर सेलने तपास करत या विद्यार्थ्याचा शोध लावला. आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याने हे कृत्य केल्याच पाहून शिक्षिकाही हैराण झाली. सतत काही ना काही कारणाने शिक्षिका अपमान करत असल्याची भावना या मुलाच्या मनात होती. याचा सूड घेण्यासाठीच शिक्षिकेचं बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केल्याची माहिती या विद्यार्थ्याने पोलिसांना दिली.
या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.