व्हिडिओ : दोन मिनिटांत शिक्षिकेनं चिमुरड्याला ४० कानाखाली मारल्या
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... हजेरी घेताना विद्यार्थ्यानं `येस मॅम` असं म्हटलं नाही त्यामुळे शिक्षिकेनं केवळ दोन मिनिटांत तब्बल ४० कानाखाली मारल्यात.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय... हजेरी घेताना विद्यार्थ्यानं 'येस मॅम' असं म्हटलं नाही त्यामुळे शिक्षिकेनं केवळ दोन मिनिटांत तब्बल ४० कानाखाली मारल्यात.
तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून झोडपलं. ही संपूर्ण घटना शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
मीडिया रिपोर्टनुसार, पीजीआय भागात राहणाऱ्या प्रवेंद्र गुप्ता यांचा ८ वर्षीय मुलगा रितेश गुप्ता हा जॉन विनी स्कूलमध्ये शिकतोय. प्रवेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी घरी परतलेला त्यांचा मुलगा अत्यंत हिरमुसून बसला होता. त्याचे गाल सुजलेले होते... पण तो काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याला विश्वासात घेऊन आई-वडिलांनी चौकशी केल्यानंतर मुलानं शिक्षिकेनं मारल्याचं सांगितलं.
यानंतर आई-वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली... त्यांना सगळी हकीगत सांगून शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा आग्रह त्यांनी केला. मुख्याध्यापकांनी फुटेज तपासलं तेव्हा हजेरी घेण्यासाठी आलेली शिक्षिका रेटिका ही मुलाला मारहाण करताना दिसली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही शिक्षिका मुलाला तब्बल दोन मिनिटे कानाखाली मारताना दिसतेय. या दरम्यान तिनं मुलाला तब्बल ४० वेळा कानाखाली मारल्यात.
यानंतर या शिक्षिकेवर कारवाई करत शाळेनं तिला कामावरून कमी केलंय.