`2024 मध्ये मर्डर करुन टाकला,` डॉक्टरच्या हत्येनंतर तरुणाची सोशल मीडियावर पोस्ट, पोलिसांची धावाधाव
दिल्लीमध्ये (Delhi) एका 17 वर्षीय मुलाला 55 वर्षीय डॉक्टरची हत्या (Doctor Murder) करण्यात आल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. तरुणाने डॉक्टरच्या खासगी रुग्णालयात त्याची हत्या केली.
दिल्लीमध्ये (Delhi) एका 17 वर्षीय तरुणाने डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने 55 वर्षीय डॉक्टरची त्यांच्याच रुग्णालयात हत्या केली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. दक्षिण दिल्लीमधील कलिंदी कुंज परिसरातील निमा रुग्णालयात ही घटना घडली. आरोपी तरुण आपल्या मित्रासह प्राथमिक उपचारासाठी आला होता. यावेळी त्यांनी डॉक्टर जावेद अख्तर यांची हत्या केली. आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून, मित्र फरार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीने पोलिसांना डॉक्टरने उपचारासाठी जास्त पैसे आकारल्याने त्याची हत्या केली असं सांगितलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने हत्या केल्यानंतर सोशळ मीडियावर फोटोसह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की, 'अखेर 2024 मध्ये मर्डर करुन टाकला'.
दोन्ही मुलं एकाच परिसरात वास्तव्यास असून, हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी नर्सिंग होममधील नर्स आणि तिच्या पतीची याप्रकरणी चौकशी केली आहे.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलं बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांच्यातील एकाने जखमी पायाचं ड्रेसिग बदलण्यास सांगितलं. आदल्या रात्री याच रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले होते. ड्रेसिंग झाल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रिस्क्रिप्शन हवं आहे सांगत अख्तर यांच्या केबिनमध्ये गेले.
काही मिनिटांनंतर नर्सिंग स्टाफ गजला परवीन आणि मोहम्मद कामिल यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये धाव घेतली असता त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आलं.
ही घटना कोलकात्याच्या भयानक घटनेच्या दोन महिन्यांहून कमी कालावधीनंतर घडली आहे ज्यात एका सरकारी रुग्णालयात रात्रीच्या शिफ्टमध्ये असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोलकाता घटनेमुळे डॉक्टरांनी तैनात असलेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी करत देशव्यापी निषेध केला होता.