Crime News : बहिणीला छेडल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावाची आरोपींनी चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीत (Delhi) अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोन जण अल्पवयीन आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या पटेलनगर इथली घटना
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीतल्या पटेलनगर इथली आहे. हत्या झालेल्या मुलाचं नाव मनोज असून तो 17 वर्षांचा आहे. मनोजच्या बहिणीची काही तरुणांनी छेड काढली. बहिणीच्या मदतीला मनोज धावला आणि त्याने त्या तरुणांना जाब विचारला. यावरुन संतापलेल्या तरुणांनी मनोजला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका तरुणाने मनोजच्या पाठित चाकू भोसकला. यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.


लोकांची बघ्याची भूमिका
मनोजवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना घडत असताना अनेक जण तिथे होते, पण एकानेही पुढे येऊन मनोजला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काही लोकं तर तिथून निघून जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांना कळवण्याची किंवा मनोजला रुग्णालयात नेण्याची तसदीही कोणी घेतली नाही. वेळीच मनोजला मदत मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता.



कुटुंबांचा आक्रोश
मनोज हा आपल्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. मनोज आयआयटी पूसा इथे शिकत होता. मनोजच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी गुंडगिरी करणाऱ्या तरुणांना वेळीच आवर घातला असता तर ही घटना घडली नसती असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. 


दोन आरोपींना अटक
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दोनही आरोपी अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.