पटना : बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.


४५ मिनिटांच्या चर्चेनंतर तेजस्वी बाहेर पडले. पण मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं न देताच निघून गेले. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला राजदचा पाठिंबा आहे. राजदकडे 80 आमदार असल्यानं तेजस्वींचा राजीनामा घेतला, तर सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे. पण सुशासन बाबू म्हणून ख्याती असणाऱ्या नीतिश कुमारांना तेजस्वी यादवांचं मंत्रीपद म्हणजे डोळ्यातलं कुसळ ठरतं आहे त्यामुळेच तेजस्वींना मंत्रीपदावरून दूर करण्यासाठी जेडीयूनं दबाव वाढवला आहे. एकाबाजूला सरकार वाचावायचं आणि दुसऱ्या बाजूला प्रतिमा सांभाळायची अशा दुहेरी कात्रीत सध्या नितीश कुमार सापडले आहेत.