पाटणा : दीर्घकाळानंतर आज माजी आरोग्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजप्रताप यादव आपल्या कुटुंबीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहचले. त्यांनी या दरम्यान तेजस्वी यादव आणि आई राबडी देवी यांची भेट घेतली. तेजप्रताप यादव यांनी तेजस्वी यादव यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर तेजप्रताप यांनी मीडियाशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटस्फोट घेण्याबद्दलही जाहीरपणे आपलं मत मांडलं. 'मला ऐश्वर्या किंवा तिच्या कुटुंबीयांसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. ते काय बोलत आहेत किंवा काय बोलत नाहीत, याच्याशी मला काहीही देणं-घेणं नाही. मी त्यांच्यासोबत सर्व नाती तोडली आहेत' असं यावेळी तेजप्रताप यांनी म्हटलंय. 


ते माझ्याशी कसं वागतात, हे केवळ मलाच माहीत आहे. ते माझा पत्ता माहीत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु, यामुळे काहीही होणार नाही आणि हा माझा खासगी प्रश्न आहे. या लढाईत माझे आई-वडील माझ्यासोबत आहेत. पुढची सुनावणी ८ जानेवारी रोजी आहे आणि मी लढाईसाठी तयार आहे, असंही यावेळी त्यांनी म्हटलंय. 


घटस्फोटाचा अर्ज दिल्यानंतर तेजप्रताप यादव पाटणापासून दूरच तीर्थस्थळांचं दर्शन घेताना दिसत आहेत. यामुळे ते आपल्या घरापासून आणि कुटुंबापासूनही दूर आहेत. पाटण्यात परतल्यानंतर त्यांनी सरकारी निवासस्थानाची मागणी केली आणि तिथे राहायलाही गेले. 


याआधी, यादव आणि राय अशा दोन्ही कुटुंबानं आपल्यावर दबाव टाकण्याचा आणि माझ्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केल्याचं तेजप्रताप यादव यांनी म्हटलं होतं. आता मात्र, आपले आई-वडील आपल्यासोबत असल्याचं सांगत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिलाय.