तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, `हिंदूंना मारण्याची...`
Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.
Telangana Assembly : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) घवघवीत यश मिळालं आहे. तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली आहे. मात्र तेलंगणात निवडणुकीपूर्वी एकमेकांवर आरोप करणाऱ्या एआयएमआयएम (AIMIM) आणि काँग्रेसमध्ये आता चांगला समन्वय असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी काँग्रेस सरकारने शनिवारी सातत्याने वादग्रस्त विधाने करुन अडचणीत सापडणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांची शुक्रवारी शनिवारी सुरू होणाऱ्या तिसऱ्या तेलंगणा राज्य विधानसभेच्या पहिल्या सत्रासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शनिवारी शपथ घेणार आहेत. मात्र, अकबरुद्दीन ओवेसी यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यावरून वाद सुरू झाला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नसल्याचे भाजप आमदार टी राजा यांनी म्हटले आहे.
"भारतीय राज्यघटनेच्या कलम 180 च्या कलम (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, तेलंगणाचे राज्यपालांद्वारे, अकबरुद्दीन ओवेसी यांची तेलंगण विधानसभेचे सदस्य म्हणून तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 178 अन्वये सभापती निवडून येईपर्यंत विधानसभेत निवडून आलेले सदस्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 188 अन्वये आवश्यकतेनुसार शपथ किंवा प्रतिज्ञा आणि सदस्यत्व घेतील अशी व्यक्ती असावी," अशी नोटीस जारी करण्यात आली आहे.
भाजपचा विरोध
अकबरुद्दीन ओवेसी यांना ही जबाबदारी देण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर त्यांचा एकही आमदार शपथ घेणार नसल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. बीआरएसनेही एआयएमआयएमला अशीच जबाबदारी दिली होती. तेलंगणात राहणाऱ्या हिंदूंना मारण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीसमोर शपथ घेता येईल का? रेवंत रेड्डी, बीआरएस आणि एआयएमआयएम यांच्यात नातं आहे, असंही भाजपने म्हटलं आहे. विधानसभेत इतरही अनेक ज्येष्ठांना ही संधी देता आली असती. मात्र, अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे, असाही आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
'जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही. 2018 मध्ये एआयएमआयएमच्या आमदाराला प्रोटेम स्पीकर बनवले होते आणि तरीही मी शपथ घेतली नाही. काँग्रेसचे सरकारही बीआरएसच्या धर्तीवर चालणार का,' असा सवाल टी राजा यांनी केला आहे.
दरम्यान, प्रोटेम स्पीकर हे तात्पुरती भूमिका बजावतात. जोपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांची शपथ घेतली जात नाही आणि सभापती निवडले जात नाही तोपर्यंत प्रोटेम स्पीकर विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज चालवतात. एकदा विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर, प्रोटेम स्पीकरची कर्तव्ये संपतात.