Criminal Took Flights To Commit Robbery: केरळ पोलिसांनी बुधवारी एका चोराला अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चोराची मोडस ऑपरेंडी समजल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले आहेत. हा चोर चोरी करण्यासाठी चक्क विमानाने दुसऱ्या शहरांमध्ये जायचा असं तपासात समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संपती उमाप्रसाद असं असून तो तेलंगणमधील खम्मम जिल्ह्यातील बेलापल्लीचा रहिवाशी आहे. संपती उमाप्रसादला पोलिसांनी केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरममधून अटक केली आहे. मे महिन्यापासून संपती उमाप्रसाद केरळच्या राजधानीमध्ये वास्तव्यास असून त्याने शहरातील 3 घरांमध्ये दरोडा टाकल्याचं उघड झालं आहे.


एकूण 6 लाखांची चोरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपती उमाप्रसादला केरळ पोलिसांनी तिरुवनंतपुरम विमानतळवरुन अटक केली आहे. संपती उमाप्रसाद हा हैदराबादवरुन तिरुवनंतपुरममध्ये चोरी करुन लपवलेला माल घेण्यासाठी आलेला असताना विमानतळावरच पोलिसांनी त्याला अटक केली. "संपती उमाप्रसाद हा विमानाने 28 मे रोजी हैदराबादवरुन तिरुवनंतपुरममध्ये आला होता. त्याने अनेक पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यानंतर तो 2 जून रोजी परतला. नंतर तो पुन्हा 6 जूनला शहरात दाखल झाला आणि त्याने 3 जागी चोऱ्या केल्या. त्याने फोर्ट आणि पेठा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या केल्या. चोऱ्या केल्यानंतर ते 1 जुलै रोजी विमानाने परत निघाला होता," अशी माहिती तिरुवनंतपुरम शहर पोलीस आयुक्त सी. एच. नागराजू यांनी दिली आहे. "संपती उमाप्रसादने 5 लाखांचं सोनं आणि हिरे चोरले होते. त्याने ही चोरी मोल्लाविलाकम येथे केली. त्याने मानाकडू येथून 50 हजारांचेही हिरे चोरले. तिसरी चोरी त्याने वाझापल्ली येथे केली. या ठिकाणी त्याने 27 हजारांचं सोनं चोरलं," असंही पोलिसांनी सांगितलं आहे.


रेल्वे ब्रिजजवळ लपवलेला चोरीचा माल


तिरुवनंतपुरम शहरामध्ये प्रवासासाठी संपती उमाप्रसादने वापरलेल्या रिक्षाच्या चालकाचा पोलिसांनी शोध घेतला. या चालकानेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणी गुन्हे घडले त्या परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये संपती उमाप्रसाद दिसून आला. त्याने चेहरा लपवला असला तरी त्याच्या चलीवरुन आणि इतर हलचालींवरुन त्याची ओळख पटली. पोलिसांनी हॉटेलमधील रेकॉर्डस तपासण्यात सुरुवात केली आणि संपती उमाप्रसाद इथे आल्याचं स्पष्ट झालं. तो बुधवारी हैदराबादवरुन पुन्हा तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाला असता पोलिसांनी त्याला विमानतळावरच पकडलं. अटकेनंतर पोलिसांनी संपती उमाप्रसादकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने हा सर्व माल तिरुवनंतपुरममधील चक्का रेल्वे ब्रिजजवळ लपवला होता.



एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 वर्षीय संपती उमाप्रसाद हा त्याच्या मूळ शहरामध्ये अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. एकेकाळी संपती उमाप्रसादला माऊंट एव्हरेस्ट सर करायचा होता. मात्र पुरेसे पैसे नसल्याने त्याला हे जमलं नाही. त्यामुळेच त्याने पैसे कमवण्यासाठी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं. मात्र गुन्हेगार होण्याआधी एव्हरेस्ट मोहीम हे संपती उमाप्रसादचं एकमेव लक्ष्य होतं. तपासादरम्यान संपती उमाप्रसादने यापूर्वी कंत्राटी तत्वावर पोलिसांबरोबर काम केल्याचं उघड झालं. त्यामुळे त्याला पोलीस तपास कसा करतात हे ठाऊक होतं. त्यामुळे आतापर्यंत त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होतं असं केरळ पोलिसांचं म्हणणं आहे.